मोबाईलला चार वर्षे रामराम; आत्मशिस्तीच्या बळावर सई देसलेची जिल्ह्यात प्रथम झेप

नीटमध्ये ७२० पैकी ६७१ गुण; देशात ४६३ वा क्रमांक, एम्समधील प्रवेशाचा मार्ग मोकळा

अमळनेर (प्रतिनिधी) मोबाईल आणि समाजमाध्यमांपासून तब्बल चार वर्षे स्वतःला दूर ठेवत आत्मशिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर जळगावच्या सई देसले हिने नीट-यूजी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सईने ७२० पैकी ६७१ गुण मिळवत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, देशपातळीवर ४६३ वा क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे देशातील प्रतिष्ठित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) प्रवेशाचा तिचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे.

सई देसले ही अर्थशास्त्र विषयाचे लेखक व प्राध्यापक डॉ. किरण देसले आणि वैद्यकीय व्यवसायात कार्यरत डॉ. गीता देसले यांची कन्या आहे. शैक्षणिक वातावरण, उत्तम संस्कार आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन यांची जोड तिच्या अथक परिश्रमांना मिळाल्याने हे उल्लेखनीय यश शक्य झाले आहे. सई देसलेच्या या दैदिप्यमान यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिची यशोगाथा हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संस्कार, सातत्यपूर्ण परिश्रम, आत्मशिस्त आणि पालकांचे योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे सईने आपल्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

 

नववीपासून मोबाईलला रामराम

 

सईच्या यशामागे तिची अभ्यासातील शिस्त हीच सर्वात मोठी ताकद ठरली. इयत्ता नववीपासून तब्बल चार वर्षे तिने मोबाईल आणि समाजमाध्यमांचा वापर पूर्णपणे टाळला. नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिकांचा सराव, वेळेचे काटेकोर नियोजन, व्यायाम आणि ध्यान यांचा समतोल दिनक्रम तिने कायम ठेवला.

मोबाईलपासून दूर राहिल्यामुळे अभ्यासात अधिक एकाग्रता साधता आली आणि ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले, असे सईने सांगितले.

‘सईसारखी विद्यार्थिनी आणि ती माझी मुलगी असणे हे माझे भाग्य’

मुलीच्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. किरण देसले म्हणाले, “गेल्या पंचवीस वर्षांपासून मी विद्यार्थ्यांना शिकवत आहे. हजारो विद्यार्थी पाहिले; मात्र सईसारखी अभ्यासू, आत्मशिस्तीची आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी लाभणे, त्यात ती माझी मुलगी असणे हे माझे भाग्य आहे. ध्येय निश्चित झाल्यानंतर तिने कधीही विचलित न होता सातत्याने मेहनत घेतली. तिची चिकाटी आणि निष्ठाच तिच्या यशाचे खरे गमक आहे.”

डॉ. गीता देसले यांनीही पालकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. घरातील वातावरण सकारात्मक ठेवणे, मुलांवर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या भावना समजून घेणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. मुलांना केवळ गुणांसाठी नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांसाठी प्रेरणा दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

पालकांना दिला महत्त्वाचा संदेश

 

डॉ. किरण देसले यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, मुलांवर सतत अभ्यासासाठी दबाव टाकण्याऐवजी त्यांच्या क्षमता आणि अभ्यासपद्धती समजून घ्यावी. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचाही तितकाच सहभाग असतो. योग्य मार्गदर्शन, मानसिक आधार आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास विद्यार्थी कोणतेही ध्येय गाठू शकतो.

सलग दोन वर्षे दररोज पाच ते सहा तास नियोजनबद्ध आणि एकाग्रतेने अभ्यास केल्यास नीटसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणे शक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

यशाची गुरुकिल्ली

 

सईच्या यशामागील प्रमुख सूत्रे संकल्पना समजून घेऊन अभ्यास करणे, नियमित व नियोजनबद्ध अभ्यास, प्रश्नपत्रिका व बहुपर्यायी प्रश्नांचा सातत्यपूर्ण सराव, मोबाईल आणि समाजमाध्यमांपासून दूर राहणे, नियमित व्यायाम व ध्यान, वेळेचे प्रभावी नियोजन, ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित ठेवणे ही आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *