शेतकऱ्यांना दिवसा फुल पॉवर; वीज यंत्रणा बळकटीसाठी युद्धपातळीवर कामे

आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरणाशी संबंधित विविध समस्या, विशेषतः कृषी पंपांना दिवसा सुरळीत व पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात शेतकऱ्यांना दिवसा फुल पॉवर; वीज यंत्रणा बळकटीसाठी युद्धपातळीवर कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे (धरणगाव विभाग), ज्ञानेश्वर अंबाडकर (अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अमळनेर शहर उपविभाग), मनोज भावसार (उपकार्यकारी अभियंता, अमळनेर ग्रामीण उपविभाग), अविनाश सूर्यवंशी (सहाय्यक अभियंता, पायाभूत आराखडा, धरणगाव), तसेच सहाय्यक अभियंते चैतन्य वाघ, विनायक बोरसे व अमित चव्हाण उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील विद्यमान वीज वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तालुक्यात सध्या एकूण १४ ठिकाणी ३३ किलोव्होल्ट क्षमतेची उपकेंद्रे कार्यरत असून वाढती वीज मागणी आणि विशेषतः कृषी क्षेत्रातील वाढता भार लक्षात घेता वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी सहा उपकेंद्रांमध्ये नवीन अतिरिक्त शक्ती रोहित्र मंजूर करण्यात आले आहेत. यात ३३ किलोव्होल्ट वावडे, ३३ किलोव्होल्ट अंतुर्ली, ३३ किलोव्होल्ट जानवे, ३३ किलोव्होल्ट कळमसरे, ३३ किलोव्होल्ट सरबेटे आणि ३३ किलोव्होल्ट भरवस या उपकेंद्रांचा समावेश आहे. ही सर्व कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संबंधित उपकेंद्रांवरील भाराचे योग्य नियोजन होऊन वीज वितरण क्षमता वाढणार आहे. तालुक्यातील ३३ किलोव्होल्ट जानवे, सरबेटे, कळमसरे व गांधली या उपकेंद्रांमधून निघणाऱ्या कृषी वाहिन्यांवरील कृषी पंपांना सध्याच्या वाढत्या भारामुळे दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करणे आव्हानात्मक ठरत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या चारपैकी तीन उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी ५ मेगावॉट-अँपिअर क्षमतेची अतिरिक्त शक्ती रोहित्रे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे कामही नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यामुळे कृषी वाहिन्यांवरील भाराचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. वीज वितरण अधिक मजबूत करण्यासाठी ३३ किलोव्होल्ट शिरूड येथे नवीन उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील वीज वितरणावरील भाराचे विभाजन होऊन पुरवठ्याची विश्वासार्हता वाढणार आहे. तसेच भविष्यातील वाढती कृषी, घरगुती व व्यावसायिक मागणी भागविणे शक्य होणार आहे. बैठकीत शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा मिळणारा वीजपुरवठा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह करण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, अतिरिक्त शक्ती रोहित्रे बसविणे, नवीन उपकेंद्रे उभारणे आणि विद्यमान यंत्रणेचे बळकटीकरण करण्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदर सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार अनिल पाटील यांनी संबंधित अधिकारी व अभियंत्यांना दिल्या आहेत. नोव्हेंबर २०२६ अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर अमळनेर तालुक्यातील कृषी पंपांना दिवसा अधिक सक्षम, सुरळीत आणि विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *