
जनगणनेसंदर्भात आदिवासी समाजाने तहसील कार्यालयात दिली धडक
“आदिवासींचा कोणत्याही धर्म किंवा जाती प्रवर्गाशी संबंध नाही” ; प्रगणकांना गावात न येण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी समाजाचा कोणत्याही धर्माशी अथवा जाती प्रवर्गाशी संबंध नसल्याचा दावा करत जनगणनेसाठी कोणत्याही प्रगणक अथवा अधिकाऱ्याने येऊ नये, अशी मागणी ‘ए सी भारत सरकार’च्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे केली. यावेळी नायब तहसीलदार सी. यू. पाटील यांची भेट घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.
अमळनेर तालुका तसेच परिसरातून सुमारे २५ ते ३० जण तहसील कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत, “आदिवासी हा हिंदू भिल किंवा शारदा भिल नसून तो अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातही मोडत नाही,” असा दावा केला. तसेच “आदिवासी समाजाचा समावेश कोणत्या धर्मात आणि कोणत्या कॉलममध्ये करणार?” असा सवाल उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आला. “आदिवासी म्हणजे आदिम मूळ रहिवासी असून ते आठ टक्के आहेत, तर उर्वरित ९२ टक्के लोक गैरआदिवासी असून ते बाहेरून आलेले आहेत. त्यांची गणना केली जात आहे; मात्र मूळ आदिवासींची गणना कोणत्या आधारावर केली जाणार?” असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच, “प्रगणकांकडे पासपोर्ट, व्हिसा, रहिवासी प्रमाणपत्र तसेच भारत सरकारचे गॅझेट नंबर असल्यासच आदिवासी समाजाची माहिती दिली जाईल, अन्यथा प्रगणकांनी गावात येऊ नये,” असे आवाहनही करण्यात आले. “आम्ही आमची फाईल देऊन जात आहोत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावे. त्यानंतर आम्ही पुढील चर्चा करू,” असेही प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी एसी मगन अनुबाई बुधा (दहिवद), एसी गोकुळ कलाबाई ताराचंद फुला (साळवे, ता. धरणगाव), एसी गणेश बानुबाई त्र्यंबक (अमळनेर), एसी हिरालाल लिलाबाई युवराज (गिरड, ता. भडगाव) यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. नायब तहसीलदार सी. यू. पाटील व सुषमा घोंगडे यांनी निवेदन स्वीकारून, “याबाबत आयोग व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील माहिती दिली जाईल,” असे आश्वासन दिले.

Leave a Reply