प्रताप पॅटर्नमध्ये जेईई, नीट व एमएचटी-सीईटी २०२६ मधील गुणवंतांचा भव्य सत्कार; विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

अमळनेर (प्रतिनिधी): प्रताप पॅटर्नमार्फत व्हीए क्वांटम इन्स्टिट्यूटच्या वतीने जेईई, नीट व एमएचटी-सीईटी २०२६ या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासोबतच स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल होते, तर कार्यउपाध्यक्ष जितेंद्र मोहनलाल जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संचालक हरी भीका वाणी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, सौ. माधुरी प्रमोद पाटील, सौ. लीना प्रवीण पाटील, कमल कोचर, वसुंधरा लांग्रे, प्रा. पराग पाटील, अमोल मानके तसेच प्रताप पॅटर्नचे समन्वयक वसंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी २०२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या ३० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सत्कारावेळी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना प्रताप पॅटर्नचे संचालक विक्रांत कुमार यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशासाठी केवळ पाठांतर नव्हे, तर विषयातील मूलभूत संकल्पना समजून घेणे, नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव यांचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक विषय समजून घेऊन अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यात पसरविल्या जाणाऱ्या “जेईई किंवा नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये यश मिळत नाही” या समजुतीला फेटाळून लावत, योग्य नियोजन, अभ्यास आणि मार्गदर्शनाच्या बळावर विद्यार्थी तिन्ही परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. अफवांवर विश्वास न ठेवता योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थी व पालकांना केले.

कार्यक्रमात सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य, शिस्तबद्ध दिनचर्या आणि सातत्यपूर्ण अभ्यासाला दिले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन विक्रांत कुमार यांनी केले, तर प्रताप पॅटर्नची माजी विद्यार्थिनी राजनंदिनी यादव हिने प्रभावी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा सत्कार सोहळा केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणारा न ठरता, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा, आत्मविश्वास आणि यशाचा मार्ग दाखविणारा उपक्रम ठरला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *