सावखेडा तापी नदीपात्रातील जप्त वाहने दोन दिवसांपासून नदीतच पडून असल्याने महसूल विभागावर नागरिक संतप्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ७४ लाख ४९ हजार ३४४ रुपयांच्या दंडाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र कारवाईनंतर जप्त करण्यात आलेली वाहने दोन दिवस उलटूनही नदीपात्रातून हलविण्यात आलेली नसल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अमळनेर-चोपडा, पोलीस निरीक्षक, तहसीलदार अमळनेर तसेच महसूल पथकाने २७ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सावखेडा येथील तापी नदीपात्रावर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने पंचनामा करून १२ बोटी, १० पोकलेन आणि ६ डंपर अशी यंत्रसामग्री जप्त केली.

कारवाईनंतर सदरची वाहने तात्काळ तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयात जमा करणे अपेक्षित असताना दोन दिवस उलटूनही ही वाहने नदीपात्रातच पडून आहेत. जप्त वाहनांच्या सुरक्षेसाठी अमळनेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

इतर ठिकाणी कारवाई करताना तत्परता दाखविणारा महसूल विभाग अवैध वाळू उपसा प्रकरणात मात्र दिरंगाई का करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नदीपात्रातच वाहने ठेवण्यात आल्याने पुरावे नष्ट होण्याची अथवा यंत्रसामग्री पुन्हा वापरली जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, “जप्त करण्यात आलेले ६ डंपर चालवून आणणे शक्य आहे. मात्र १२ बोटी व १० पोकलेन नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी क्रेन व ट्राला यांसारख्या अवजड वाहतूक साधनांची आवश्यकता आहे. संबंधित वाहन मालकांशी चर्चा सुरू असून लवकरच जप्त वाहने तालुक्याच्या ठिकाणी आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच नदीपात्रातील १५५० लिटर डिझेलचा अवैध साठा प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणी घेण्यात येणार आहे,” अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *