एटीएममध्ये पैसे नसल्याने शेतकऱ्यांचे हाल; कृषी कर्ज रोखीने देण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी )तालुक्यातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसणे तसेच काही एटीएममध्ये कृषी कार्ड चालत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्ज मंजूर होऊनही प्रत्यक्ष रक्कम मिळत नसल्याने शेतीची मशागत रखडली असून शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम रोखीने देण्याची मागणी केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणी सहन करत ३१ मार्चपूर्वी जुने कर्ज रोखीने फेडले. त्यानंतर २० एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांना आयसीआय बँकेचे कृषी एटीएम कार्ड देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात एटीएममधून पैसे मिळत नसल्याने शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून वणवण भटकत आहेत.

अनेक एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याची तक्रार असून काही बँकांच्या एटीएममध्ये कृषी कार्ड स्वीकारले जात नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे. याबाबत यापूर्वीही जिल्हा बँकेकडे अनेकदा निवेदने देण्यात आली होती. जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत निम्मे कर्ज रोखीने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार व व्यवस्थापकीय संचालक यांनी शेतकऱ्यांना रोखीने कर्ज देण्याची व्यवस्था करावी, तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा अग्रणी बँकेने एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पवार, दिलीप पाटील, नवनीत पाटील, राजेंद्र पाटील, दीपक प्रभाकर, सुभाष संतोष पाटील आदींसह अनेक शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *