अमळनेर तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; ७ विहिरी अधिग्रहित करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात वाढत्या तापमानासह ‘एल निनो’चा परिणाम जाणवू लागल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध गावांमधील खासगी विहिरी अधिग्रहित करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. एकूण ७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून त्यातून संबंधित गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुपी येथील भाऊसाहेब लोटन पाटील (गट क्र. १८९) यांची गडखांब विहीर, विजय हिरामण पाटील (गट क्र. ८४२) यांची मांजर्डी विहीर तसेच मनाज हिरामण पाटील यांची विहीर १६ एप्रिल २०२६ रोजी अधिग्रहित करण्यात आली. या तिन्ही विहिरींतून गावांसाठी टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दहिवद खुर्द येथील गुरुदत्त वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळाची विहीर (गट क्र. १९२), जुनोने येथील अमाद इंद्रसिंग राजपूत (गट क्र. २१४/१) यांची विहीर आणि भोरटेक येथील यवराज शेनपडू संदानशिव यांची विहीर देखील १६ एप्रिल रोजी अधिग्रहित करण्यात आली आहे.

दरम्यान, पळासदळे येथील विहीर (गट क्र. ५५५/१/ख) २७ एप्रिल २०२६ रोजी अधिग्रहित करण्यात आली असून या विहिरीतूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विहीर रिफिलिंग करून अधिग्रहित करण्यात आली आहे.

प्रशासनाने लोकसंख्येचा विचार करून टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असून स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

तत्काळ उपाययोजना करण्यात येईल

पुढील काळात आवश्यकता भासल्यास आणखी विहिरी अधिग्रहित करण्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यात येईल. रुपेश कुमार सुराणा, तहसीलदार 

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *