फवारणीसाठी पाणी काढताना पाय घसरला; विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) स्वतःच्या शेतात औषध फवारणीसाठी पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक दत्तूसिंग राजपूत (वय ३१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तालुक्यातील कळमसरे गावाबाहेरील गणपती मंदिर परिसरातील विहिरीवर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक दत्तूसिंग राजपूत हे बैलगाडीसह स्वतःच्या शेताकडे जात होते. शेतात औषध फवारणी करण्यासाठी फवारणी पंपात पाणी भरण्याकरिता ते गावाबाहेरील गणपती मंदिराजवळील विहिरीवर थांबले. त्यांनी विहिरीतून चार ते पाच बादल्या पाणी काढले. शेवटची बादली काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ते विहिरीत पडले. दरम्यान, मंदिराशेजारी असलेल्या किशोर हरी मालचे यांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने गावातील दीपक राजपूत यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने दीपक दत्तूसिंग राजपूत यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील तसेच सरपंच यांनी घटनास्थळी पंचनामा करून मारवड पोलिसांना खबर दिली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दीपक दत्तूसिंग राजपूत यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दीपक दत्तूसिंग राजपूत यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. घरातील कर्ता मुलगा अचानक गेल्याने राजपूत कुटुंबावर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साजित मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *