हजारो डोळ्यांत अश्रू, हृदयात अभिमान… कोळपिंप्रीच्या वीरपुत्राला अखेरचा सलाम!

कोळपिंप्रीचा वीरपुत्र लान्स नायक रोहित पाटील (काटे) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अखेरची मानवंदना देण्यासाठी लोटला जनसागर; ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमले कोळपिंप्री

 (प्रतिनिधी) : देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री गावचे भूमिपुत्र लान्स नायक रोहित नारायण पाटील (काटे) यांना ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. तिरंग्यात लपेटलेले वीर जवानाचे पार्थिव गावात दाखल होताच हजारो नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. ‘भारत माता की जय’, ‘शहीद जवान अमर रहे’ आणि ‘वीर जवान रोहित पाटील अमर रहे’च्या घोषणांनी संपूर्ण कोळपिंप्री दुमदुमून गेले.

 

तिरंग्यात लपेटून वीरपुत्राचा अखेरचा प्रवास; कोळपिंप्री अश्रूंनी न्हाऊन निघाले!

 

रोहित पाटील हे भारतीय सैन्य दलातील १ पॅरा (स्पेशल फोर्सेस) युनिटमध्ये कार्यरत होते. १ सप्टेंबर २०२६ रोजी हरियाणा राज्यातील यमुनानगर येथील हथिनी कुंड बॅरेज परिसरात सैन्याच्या प्रत्यक्ष मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना वीरमरण आले. चिनूक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरू असलेल्या डायव्हिंग व हेलोकास्टिंग सरावात सहभागी असताना ही दुर्दैवी घटना घडली.

रोहित पाटील यांचे पार्थिव गावात दाखल होताच संपूर्ण वातावरण भावुक झाले. ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान अमर रहे’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. एका बाजूला देशभक्तीचा अभिमान, तर दुसऱ्या बाजूला आपल्या लेकराला गमावल्याचे दुःख अशा संमिश्र भावनांनी संपूर्ण गाव अक्षरशः हेलावून गेले होते.

पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. ज्याच्या शौर्यामुळे देशाचा तिरंगा अभिमानाने फडकतो, त्या वीराला निरोप देताना गावकऱ्यांचे काळीज मात्र भरून आले होते. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

 

हेलिकॉप्टरने आणण्याचे नियोजन; खराब हवामानामुळे अखेर रस्तेमार्गे पार्थिव गावात

 

वीर जवान रोहित पाटील यांचे पार्थिव नाशिक येथे आणल्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने अमळनेर येथे आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी विजय नाना स्कूलजवळ हेलिपॅडची तयारी करण्यात आली होती. हेलिकॉप्टरची ट्रायल लँडिंगही घेण्यात आली होती. मात्र, नाशिक परिसरात पावसामुळे हवामान खराब झाल्याने हेलिकॉप्टरने पार्थिव आणणे शक्य झाले नाही. अखेर पार्थिव रस्तेमार्गे कोळपिंप्री येथे आणण्यात आले.

पार्थिव गावात पोहोचताच नागरिकांनी एकच गर्दी केली. तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. ‘भारत मातेचा हा वीरपुत्र आज आपल्यातून निघून जात आहे’ या भावनेने प्रत्येकाचे मन हेलावून गेले.

 

मान्यवरांची उपस्थिती; वीर जवानाला श्रद्धांजली

 

यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील आणि पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांनी उपस्थित राहून वीर जवान रोहित पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

याशिवाय अमळनेर, पारोळा व परिसरातील हजारो नागरिक, माजी सैनिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बंदुकीच्या फैरींनी दिली अखेरची मानवंदना

 

शासकीय इतमामातील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पोलिस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून वीर जवानाला अखेरची मानवंदना देण्यात आली. त्या फैरींचा आवाज ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या आपल्या वीरपुत्राला संपूर्ण गावाने डोळ्यांत अश्रू आणि हृदयात अभिमान घेऊन अखेरचा सलाम केला. नदीकाठच्या अमरधाममध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.

 

चुलत भावाने आणि चिमुकल्या हर्षदीपने दिला अग्निडाग; क्षणाने उपस्थितांचे काळीज पिळवटले

 

अंत्यसंस्काराच्या वेळी रोहित पाटील यांचे चुलत भाऊ उमेश योगराज पाटील आणि त्यांचा लहान मुलगा हर्षदीप यांनी अग्निडाग दिला. या क्षणी उपस्थितांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. आपल्या वीर भावाला आणि कुटुंबातील लाडक्या सदस्याला अखेरचा निरोप देताना उमेश पाटील यांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर चिमुकल्या हर्षदीपने दिलेला अग्निडाग पाहून उपस्थितांचे काळीज अक्षरशः पिळवटून निघाले.

 

एका वीराने देशासाठी प्राण दिले आणि एका कुटुंबाने आपला आधार गमावला…

 

रोहित पाटील यांच्या शौर्याला सलाम करताना कोळपिंप्री गावाने काल केवळ आपल्या सुपुत्राला निरोप दिला नाही, तर भारत मातेच्या या वीरपुत्राला अश्रूंनी आणि अभिमानाने अखेरची मानवंदना दिली. ‘रोहित पाटील अमर रहे!’च्या घोषणांनी आणि तिरंग्याच्या साक्षीने वीरपुत्राचा अंतिम प्रवास पूर्ण झाला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *