गोकुळाष्टमीला गोशाळेत भक्तीचा सुगंध; गोमातेची पूजा करून गोसेवेचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमीनिमित्त शहरातील पळासदडे रोडवरील श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळेत गोसेवा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, अमळनेर आणि मोहन कृषी उद्योगाचे संचालक उद्योजक गोविंद अग्रवाल यांच्या संयुक्त विद्यमाने ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन व आरती करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व भाविकांच्या हस्ते गोशाळेतील प्रत्येक गोमातेला ओला चणा, ओले मूग, गूळ आणि हिरव्या कुट्टीचे खाद्य देऊन गोसेवा करण्यात आली. यामुळे गोशाळेच्या परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्रीकृष्ण भगवान यांना गोमाता अतिशय प्रिय असल्याने गोकुळाष्टमीचे औचित्य साधून हा गोसेवा उपक्रम राबविण्यात आला. गोपालन आणि गोसेवेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच समाजात गोसेवेला प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी गोशाळेचे संचालक चेतन शाह आणि मीना शाह या दाम्पत्याचा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या निरपेक्ष व सेवाभावी कार्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. गोशाळेच्या सेवाकार्यास हातभार लागावा म्हणून कार्यक्रमाला उपस्थित अनेक मान्यवरांनी उदार मनाने देणगीही दिली.

कार्यक्रमात उपस्थित भाविकांसाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला महिला, पुरुष, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने धार्मिक भावनेला सामाजिक सेवेची जोड देत गोमातेची सेवा करण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल उद्योजक गोविंद अग्रवाल आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *