
अमळनेर बाजार समितीत सीसीआय कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) केंद्र यापूर्वीच मंजूर झाले असून किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत कापूस खरेदीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
भारतीय कापूस महामंडळातर्फे १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची नोंदणी मोफत करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, कापूस पिकाचा पेरा नोंद असलेला सातबारा उतारा, फार्मर आयडी आणि बँक पासबुक आदी कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक पाटील आणि सचिव डॉ. उन्मेष राठोड यांनी केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना बाजार समितीत प्रत्यक्ष येण्यासोबतच मोबाईलद्वारेही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ‘कपास किसान’ अॅप डाउनलोड करून त्याद्वारे नोंदणी करता येईल, अशी माहिती सीसीआय केंद्राचे प्रमुख योगेश थाळनेरकर यांनी दिली.
कापूस खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply