मारवड महाविद्यालयात पोक्सो, पॉश व अँटी रॅगिंग कायद्याबाबत जनजागृती

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह इंटरनेटच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी ) कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोक्सो कायदा, पॉश कायदा आणि अँटी रॅगिंग कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साजीत मन्सुरी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

सहायक पोलीस निरीक्षक साजीत मन्सुरी यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो, पॉश व अँटी रॅगिंग कायद्यांची माहिती देत विद्यार्थ्यांनी कायद्यांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच इंटरनेटचा वापर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी करावा, चुकीचे किंवा आक्षेपार्ह संदेश पाठविणे टाळावे, असे त्यांनी सांगितले. मेहनत, सातत्य आणि योग्य दिशेने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते. देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करावा, असा संदेश त्यांनी दिला.

प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनीही पोक्सो, पॉश आणि अँटी रॅगिंग कायद्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कला शाखेतील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत अधिकारी होऊ शकतात, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून इंटरनेटचा योग्य वापर करावा आणि आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी हेड कॉन्स्टेबल रेखा ईशी व स्मिता भालडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. विजयकुमार पाटील, प्रा. डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. जितेंद्र माळी, जगदिश साळुंखे, मंजुषा गरूड, डॉ. सचिन पाटील, शामकांत पाटील, अतुल साळुंखे, दिलीप चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *