
मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; अमळनेर पोलिसांकडून चोरट्यास अटक
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकीसह एकूण दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हरेश गंभीर चौधरी, रा. श्रीराम कॉलनी, शिरूड नाका, अमळनेर यांनी त्यांच्या मालकीची २५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९ एक्यू-२१६२) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अमळनेर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना विनायक उखा पाटील (रा. वेळोदे, ता. चोपडा, जि. जळगाव) हा चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी प्रयत्न करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, नरेश बडगुजर, नितीन मनोरे आणि उज्वल पाटील यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली. पथकाने विनायक उखा पाटील याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून फिर्यादी हरेश गंभीर चौधरी यांची हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल (एमएच-१९ एक्यू-२१६२) हस्तगत करण्यात आली. तसेच आणखी एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून एकूण दोन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

Leave a Reply