दहिवद येथील माध्यमिक शिक्षकाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात उडाली खळबळ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथील अविनाश पाटील (वय ४५) यांचा मृतदेह गावातील एका विहिरीत आढळून आल्याची धक्कादायक घटना २९ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,अविनाश पाटील हे दहिवद येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते मागील दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, २९ रोजी सकाळी गावातील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्याने त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.अविनाश पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाताई रमेश पाटील यांचे सुपुत्र होते. त्यांच्या अकस्मात निधनामुळे दहिवद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *