
१२ लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच; नगाव येथील ग्रामसेवक रंगेहात जाळ्यात
अमळनेर (प्रतिनिधी) पेव्हर ब्लॉक कामाच्या १२ लाख रुपयांच्या बिलास मंजुरी देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगाव बुद्रुक येथील ग्रामसेवक रवींद्र देविदास पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० रोजी रंगेहात पकडले. ही कारवाई केलेनगर परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगाव बुद्रुक येथील गटारी व पेव्हर ब्लॉक कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार यांनी सुमारे ७ टक्के दराने ८४ हजार रुपयांच्या कमिशनची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने ३० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यापूर्वी पवार यांनी १ हजार ३०० रुपये ‘फोन पे’द्वारे स्वीकारल्याचेही उघड झाले.
त्यानंतर सापळा रचण्यात आला. ढेकू रस्त्यावरील केलेनगर येथे स्वतःच्या घरी तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना पवार यांना पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, बाळू मराठे, किशोर महाजन, सुनील वानखेडे, भूषण पाटील, मनोज पाटील, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आणि सचिन चाटे यांच्या पथकाने केली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply