
मोबाईलला पर्याय पुस्तकांचा! गांधली-पिळोदा शाळेत बाल वाङ्मय विभाग सुरू
अमळनेर (प्रतिनिधी) : सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या आकर्षणाला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत गांधलीने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी यापूर्वी ‘मोबाईल मुक्त संध्याकाळ’ ही संकल्पना राबविण्यात आली होती. मात्र केवळ मोबाईलपासून दूर ठेवणे पुरेसे नसून, मुलांना मोबाईलला चांगला पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे चर्चेतून समोर आले. त्यातूनच जिल्हा परिषद शाळा गांधली-पिळोदा येथे बाल वाङ्मय विभाग सुरू करण्यात आला आहे.
मुलांना वाचनाचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे आणि बालपणापासूनच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बाल वाङ्मय विभाग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी रोटरियन विवेक देशमुख यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने पाच हजार रुपयांची पुस्तके ग्रंथालयाला दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध बाल वाङ्मयाची पुस्तके उपलब्ध झाली आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक पुस्तक वाचण्यासाठी देण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्याचे तसेच त्यांनी कोणते पुस्तक वाचले, याची नोंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र रजिस्टर व इतर आवश्यक साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सोशल मीडिया, ऑनलाइन गेम आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचा वाचनाकडे होणारा कल कमी होत असताना त्यांना पुस्तकांकडे वळविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. पुस्तक वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि भाषिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष महेश पाटील, रोटरियन विवेक देशमुख, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य संजयजी सिंगर साहेब, बालक बालस्नेही पंचायत अभियानाचे मार्गदर्शक नरेंद्र पाटील, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, सुधाकर नाना, एम.जी. पाटील सर, आशिष शिंदे, बालाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक व संपूर्ण स्टाफ, अंगणवाडी आशाताई, बचत गटाच्या महिला, बचत गटाच्या सदस्या, गणेश पाटील, गणेश सोनवणे, प्रशासक नरेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत गांधलीच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ मोबाईलपासून दूर राहण्याचे आवाहन न करता, त्याऐवजी पुस्तकांशी मैत्री करण्याचा सकारात्मक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गांधली-पिळोदा येथील बाल वाङ्मय विभागातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Leave a Reply