शेतातील विहिरीत पडून २ वर्षीय काळवीटाचा मृत्यू; चिमनपुरी पिंपळे येथे घटना

अमळनेर (प्रतिनिधी) शेतशिवारात खाद्याच्या शोधात धावत असताना उघड्या विहिरीत पडल्याने दोन वर्षीय काळवीटाचा मृत्यू झाल्याची घटना दि. ११ रोजी तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळे येथील शेतकरी दिलीप पंडित पाटील हे संध्याकाळच्या सुमारास माळन नदीलगत असलेल्या आपल्या शेतात गेले होते. त्यानंतर ते विहीर पाहण्यासाठी गेले असता विहिरीत एक काळवीट मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील व माजी उपसरपंच सतीश पाटील यांना माहिती देत वनविभागाशी संपर्क साधला. मारवड येथील डॉ. विलास पाटील यांनीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पथक चिमनपुरी पिंपळे येथे पाठवले. सायंकाळी उशिरा वनरक्षक दुर्गदास वानखेडे, प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृत काळवीट विहिरीतून बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. अन्न-पाण्याच्या शोधात असताना धावताना विहिरीचा अंदाज न आल्याने काळवीट विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *