कपिलेश्वरच्या त्रिवेणी संगमावर ५१ हजार पार्थिव शिवलिंगांचे पूजन

अमळनेर (प्रतिनिधी) : पश्चिम वाहिनी सूर्यकन्या माता तापी, पांझरा आणि गुमकपिलगंगा या त्रिवेणी संगमावरील श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरात पवित्र श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या ५१ हजार पार्थिव शिवलिंग पूजन अनुष्ठानाची सांगता उद्या, सोमवार ७ सप्टेंबर रोजी शेवटच्या श्रावण सोमवारी होणार आहे.

महामंडलेश्वर स्वामी हंसानंदतीर्थ महाराज यांच्या सान्निध्यात श्रावण कृ. ४/५, ४ सप्टेंबरपासून श्रावण कृ. ११, सोमवार ७ सप्टेंबरपर्यंत हे अनुष्ठान सुरू आहे. पवित्र संगम तटावर शास्त्रोक्त पद्धतीने शिवपूजन केल्याने मानवी जीवनातील दुःखांचे निवारण होते, पितृदोष दूर होतो आणि आध्यात्मिक उन्नती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात आतापर्यंत लाखो भाविकांनी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले आहे. तसेच तापी नदीतील बोटिंगचा आनंदही भाविकांनी घेतला आहे.

 

कार्यक्रमाचे स्वरूप

 

सोमवारी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत पार्थिव शिवलिंग निर्माण करण्यात येणार आहेत. सकाळी ८.३० ते १०.३० वाजेपर्यंत पार्थिव शिवलिंगांचा अभिषेक व आरती होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पार्थिव शिवपूजन करणाऱ्या भाविकांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिवाभिषेक, प्रवचनानंतर महाभंडाऱ्याने सांगता

 

सोमवार ७ सप्टेंबर रोजी शिवाभिषेक, महामंडलेश्वर स्वामी हंसानंदतीर्थ महाराज यांचे प्रवचन आणि त्यानंतर महाभंडारा अर्थात साबुदाणा फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाने ५१ हजार पार्थिव शिवलिंग पूजन अनुष्ठानाची सांगता होणार आहे.

भाविकांनी पूजेचे साहित्य सोबत आणावे तसेच जास्तीत जास्त पार्थिव शिवलिंगे स्वतःच्या हाताने तयार करून पूजनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, मुडावद-निंब व स्वामी हंसानंद तीर्थ महाराज भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *