
डेंगू-हिवताप प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; चौदा पथकांद्वारे गप्पी मासे, ऑबेट, ऑईल बॉलचा वापर
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात डेंगू व हिवतापाच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेतर्फे शुक्रवारी विविध भागांत विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी मासे सोडणे, ऑबेट, ऑईल बॉल तसेच ऑईल टाकण्याची कार्यवाही करण्यात आली.
ही मोहीम लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, सर्व नगरसेवक व नगरसेविका तसेच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. शेलकर, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे, आरोग्य निरीक्षक किशोर माळी आणि अनिल पाटील यांनी नियोजन व मार्गदर्शन केले.
या मोहिमेत चौदा पथके, त्रेचाळीस आशा कार्यकर्त्या, सर्व आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांनी सक्रिय सहभाग घेत शहरातील विविध भागांत डासांच्या अळ्यांचे निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना राबवल्या. साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी व आवश्यक उपचार करण्यात आले. ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.

Leave a Reply