दिव्यांगांचे मानधन सहा हजार रुपये करा; प्रहार संघटनेची मागणी!

आमदार अनिलदादा पाटील यांना १२ मागण्यांचे निवेदन; विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची विनंती

अमळनेर (प्रतिनिधी)  दिव्यांगांना मिळणारे २ हजार ५०० रुपयांचे मासिक मानधन वाढत्या महागाईत अपुरे पडत असल्याने ते किमान ६ हजार रुपये करावे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेने केली आहे. यासह दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांसह रोजगाराच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेने आमदार अनिलदादा पाटील यांना १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.

संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मिळणारे सध्याचे मासिक मानधन दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरेसे नाही. अन्नधान्य, औषधोपचार, प्रवास आणि इतर आवश्यक खर्च भागविताना दिव्यांग बांधवांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शारीरिक मर्यादा आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधींमुळे अनेकांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी पुरेसा आर्थिक आधार द्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

संघटनेने निवेदनातून एकूण १२ प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये दिव्यांगांचे मासिक मानधन ६ हजार रुपये करून महागाईनुसार दरवर्षी त्यात वाढ करावी, शासकीय योजनांमधील जाचक अटी शिथिल कराव्यात, बेरोजगार दिव्यांग युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, शासकीय सेवांमधील राखीव पदे तातडीने भरावीत, स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच घरकुल योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य, लॅपटॉप आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत द्यावी, शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार व औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत, तसेच कृत्रिम अवयव, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल आणि श्रवणयंत्र मोफत द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपरिषद स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधीचा पारदर्शकपणे वापर करावा, एसटी व रेल्वे प्रवास सवलतींचा लाभ सुलभतेने मिळावा, दिव्यांग महिलांसाठी विशेष योजना राबवाव्यात आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करावी, यावरही संघटनेने भर दिला आहे. दिव्यांगांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अंत्योदय अन्नधान्य योजनेचा लाभ पात्र दिव्यांगांना प्राधान्याने द्यावा, तसेच जिल्हा व तालुकास्तरावर नियमित आढावा बैठका घेऊन दिव्यांग संघटनांना शासकीय समित्यांमध्ये प्रतिनिधित्व द्यावे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आमदार अनिलदादा पाटील यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात दिव्यांग बांधवांचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, मासिक मानधन ६ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती संघटनेने केली आहे. ‘दिव्यांगांना दया नको, हक्क हवा, आश्वासन नको, प्रत्यक्ष न्याय हवा!’ या घोषणेद्वारे दिव्यांग बांधवांच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काचा आवाज संघटनेने बुलंद केला.

यावेळी करीम बागवान, फारुक शेख, बिरजू पेपरसी, नूरखान, अमोल मराठे, कलीम शेख, मंजू ताई, आबा दशमुख, सविता ताई, सलमा बागवान आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *