
अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला २० अतिरिक्त पदांची मंजुरी; ४ तज्ज्ञ डॉक्टरांसह आरोग्य सेवेला मिळणार बळ : आ. अनिल पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने २० अतिरिक्त पदांना मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे ४ तज्ज्ञ डॉक्टरांसह नर्सिंग व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार असून अमळनेर आणि परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा शासन आदेश २४ जून २०२६ रोजी प्रसिद्ध झाला असून राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नव्याने उभारण्यात आलेल्या अथवा श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती करण्यात आली आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाल्यानंतर नव्या इमारतीचे सुमारे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले असल्याने या पदवाढीस मंजुरी मिळाली आहे. विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर रुग्णालयातील पदसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
चार अतिरिक्त डॉक्टरांमुळे रुग्णांना दिलासा
अमळनेर ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी एकूण २९ पदे मंजूर होती. त्यामध्ये एक वर्ग-१ वैद्यकीय अधीक्षक, तीन वर्ग-२ वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नव्याने मंजूर झालेल्या २० पदांमध्ये चार डॉक्टरांचा समावेश असून त्यात एक सर्जन, एक फिजिशियन आणि दोन एमबीबीएस डॉक्टरांचा समावेश आहे. याशिवाय नर्सिंग व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांचीही पदे मंजूर करण्यात आली आहेत. सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत सुमारे २० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या पदभरतीनंतर रुग्णालयात आरोग्य सेवेची मोठी आणि सक्षम टीम उपलब्ध होणार असून रुग्णांना विविध तज्ज्ञ सेवा स्थानिक पातळीवर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न साकारतेय
अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे यासाठी आमदार अनिल पाटील यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि आता ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यानंतर पदवाढीसाठीही पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे श्रेणीवर्धन, नवीन इमारत आणि अतिरिक्त पदे अशा तिन्ही बाबींमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या पदवाढीमुळे अमळनेर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार असून उपचारासाठी अन्य शहरांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे तसेच रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply