
श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात लक्ष्मीपूजन; श्रीयंत्रासह लक्ष्मीमाता, भूमीमातेवर केला अभिषेक
अमळनेर (प्रतिनिधी) येथील ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिरात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनानिमित्त रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी विधिवत धार्मिक विधींसह लक्ष्मीपूजन उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लक्ष्मीमातेचे प्रतीक असलेल्या श्रीयंत्रासह श्री लक्ष्मीमाता व श्री भूमीमातेच्या उत्सवमूर्तींवर अभिषेक करण्यात आला.
या पवित्र पूजेचे विशेष मानकरी संजय जगन्नाथ मुसळे (संचालक, महालक्ष्मी लॅबरोटरी) व त्यांच्या पत्नी अर्चनाताई मुसळे, इंजि. रोहित रमेश वाणी (पुणे) व त्यांच्या पत्नी प्रणालीताई वाणी, उमाकांत अशोकराव हिरे (उपशिक्षक, जी. एस. हायस्कूल) व त्यांच्या पत्नी जागृतीताई हिरे (शिक्षिका, शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर) तसेच राहुल दिलीप बहिरम (पत्रकार, शिक्षक, जी. एस. हायस्कूल) व त्यांच्या पत्नी सुवर्णाताई बहिरम (शिक्षिका, भगिनी मंडळ) यांच्या शुभहस्ते धार्मिक विधी पार पडले. यावेळी गणपती पूजन, लक्ष्मीमातेचे पूजन, धनपूजन, वहीखात्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीमाता, भूमीमाता तसेच श्रीयंत्रावर अभिषेक करण्यात आला. आनंदोत्सवांतर्गत सर्व उत्सवमूर्तींचे पूजन झाल्यानंतर महाआरतीने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.
मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव गुरुजी, अक्षय जोशी गुरुजी आणि हेमंत गोसावी गुरुजी यांनी पौरोहित्य केले. त्यांना चेतन नाईक यांनी सहकार्य केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply