उन्हाळी हंगाम २०२६ च्या पीक पाहणीला प्रारंभ; शेतकऱ्यांनी मुदतीत नोंद पूर्ण करावी : प्रांताधिकारी मयूर भंगाळे

अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाळी हंगाम २०२६ च्या पीक पाहणी प्रयोगाला ८ एप्रिलपासून शुभारंभ झाला असून, शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली असल्यास विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकऱ्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची मदत तसेच पाऊस, वादळ किंवा इतर संकटांमुळे नुकसान झाल्यास वेळेवर भरपाई मिळण्यासाठी पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय प्रधानमंत्री पीक विमा योजना, किमान आधारभूत किंमतीने धान्य व शेतीमाल विक्री, पीक कर्ज सुविधा तसेच ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत मिळणारे विविध लाभ व अनुदान प्राप्त करण्यासाठी सातबारा उताऱ्यावर पीक पेरा नोंदवणे अनिवार्य आहे.

उन्हाळी पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी ‘डीसीएस ॲप’ (डीसीएस ॲप) प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणीची नोंद करावी. ८ एप्रिलपासून पीक पाहणी प्रयोग नोंदविण्यास परवानगी देण्यात आली असून, ही प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यासाठी शासनाने डिजिटल प्रणालीचा अवलंब केला आहे. म्हणूनच उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी अचूक व वेळेत पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *