
व्यापाऱ्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची अमळनेरात व्यापारी बांधवांनी केली मागणी
आमदार अनिल पाटलांसह पोलीस प्रशासनाला दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील न्यू प्लॉट परिसरातील ‘रिषभ फर्निचर’चे मालक प्रतीक जैन यांच्यावर दुकानात घुसून मारहाण व शिवीगाळ केल्याच्या घटनेप्रकरणी संबंधित पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी व्यापारी बांधवांनी केली आहे. यासाठी आमदार तसेच पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
व्यापारी बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३१ मार्च २०२६ रोजी प्रतीक जैन व त्यांचे वडील कैलास जैन दुकानात असताना संजय दुसाने व त्याच्यासोबत आलेल्या एका महिलेने दुकानात प्रवेश करून पैशांची मागणी केली. या वादातून प्रतीक जैन यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. तसेच दुकानात नासधूस करून कैलास जैन यांच्याशीही हुज्जत घालण्यात आली. या घटनेत प्रतीक जैन यांच्या हाताला दुखापत झाली. जैन कुटुंबीयांचा दुसाने यांच्याशी शेताचा किंवा इतर कोणताही व्यवहार नसतानाही विनाकारण पैशांची मागणी व मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. तसेच पोलीस ठाण्यातही संबंधित महिलेने धमकी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने शहरातील व्यापारी बांधवांची बैठक घेऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधितांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांनी व्यापाऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांना धीर दिला. यावेळी मार्केट समितीचे सभापती अशोक पाटील, एल. टी. पाटील, जितेंद्र ठाकूर चेतन राजपूत उपस्थित होते. त्यानंतर व्यापारी प्रतिनिधींनी उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते व पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या वेळी बिपीन कोठारी, प्रकाशचंद पारेख, मोहनलाल जैन, प्रा. ओस्तवाल, विनोद अग्रवाल, राजेंद्र झाबक, भरत कोठारी, डॉ. रवींद्र जैन, बाळू कोठारी, कैलास लोढा, चेलाराम सैनानी, रिषभ पारेख, किशोर लुल्ला, श्रीराम चौधरी, अभिजित बेदमुथा, हर्षल बोरा, विनोद पारेख, गौरव छाजेड, निलेश ओस्तवाल, पप्पू जैन, राजेश बेदमुथा, कीर्ती कोठारी, गोकुळ पारेख, दिनेश लोढा, रोहित सिंघवी, प्रफुल सिंघवी, आनंद जैन, देवेन कोठारी, प्रकाश जैन, संदेश जैन यांच्यासह असंख्य व्यापारी बांधव उपस्थित होते. तसेच या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply