मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३९ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पनवेलला रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मंगळग्रह सेवा संस्था, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाऊंडेशन (धनवाडी) आणि आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून रोजी झालेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरजू व ज्येष्ठ नागरिकांना नेत्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.

शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. विजय बामणे, डॉ. गुरुप्रीत सिंग, डॉ. राहुल पाटील आणि डॉ. भूपेंद्र वाघ यांनी निशा शिंदे व प्राची गायकवाड यांच्या सहकार्याने नागरिकांची नेत्र तपासणी केली. एकूण ७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सखोल वैद्यकीय परीक्षणानंतर ३९ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. यावेळी पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदी पूर्ण करण्यात आल्या. तत्पूर्वी उपस्थित रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना मोफत उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्याची विशेष वाहन व्यवस्था करण्यात आली. हे सर्व रुग्ण दुपारी साडेचार वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेसह आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि पुढील उपचारांची व्यवस्था आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटलमार्फत करण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

समाजातील दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्था सातत्याने कार्यरत असून दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *