
पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेच्या शिबिरात ५५१ दात्यांचे विक्रमी रक्तदान
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या आयोजनाने आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेच्या प्रस्तुत, आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या प्रेरणेने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला अमळनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात प्रथमच विक्रमी ५५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या सेवेत योगदान दिले. विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांनीही लक्षणीय सहभाग नोंदवत रक्तदान केले.
“रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…” आणि “थेंब तुमचा, जीवन त्यांचे – रक्तदान ही सर्वोत्तम सेवा” या संदेशांसह शहरातील चार ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. तेरापंथ भवन, न्यू प्लॉट, प्रताप कॉलेज, इच्छादेवी चौक आणि सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल, तांबेपुरा येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी सकाळपासूनच रक्तदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर विविध ठिकाणी रक्तदात्यांची उपस्थिती राहिली. शिबिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिलांनीही मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान केले. महिला रक्तदात्यांचा उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. “रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या” हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या उपक्रमासाठी लायन्स क्लब, अमळनेर, रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, जैन सोशल ग्रुप आणि जय बजरंग व्यायामशाळा अमळनेर आदी संस्थांनी सहयोगी म्हणून अनमोल सहकार्य केले. जीवनश्री रक्तपेढी, धुळे आणि जीवनज्योती रक्तपेढी, अमळनेर यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला दिवसभर नागरिकांचा प्रतिसाद मिळत राहिला. सायंकाळी उशिरापर्यंत शिबिर सुरू होते. ५५१ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने अमळनेरातील या उपक्रमाने विक्रमी नोंद केली असून, रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला आहे.

Leave a Reply