गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट, सामाजिक प्रबोधनाचा लोप; सजीव देखाव्यांची जागा ‘घेतली हॉरर शो’ने !

अमळनेर (प्रतिनिधी) गणेशोत्सव म्हणजे केवळ गणरायाची स्थापना आणि विसर्जन नव्हे, तर समाजाला दिशा देणारे प्रभावी व्यासपीठ म्हणूनही त्याची ओळख होती. काही वर्षांपूर्वी गणेश मंडळांकडून देशाची सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, जागतिक समस्या, भारतासमोरील आव्हाने, भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा आणि अन्याय-अत्याचार यांसारख्या विषयांवर सजीव देखावे साकारले जात. कलाकारांच्या माध्यमातून प्रसंग जिवंत करून नागरिकांना विचार करायला लावणारे संदेश दिले जात. मात्र गेल्या काही वर्षांत उत्सवाची भव्यता वाढत असताना सामाजिक प्रबोधनाचा आशय कमी होताना दिसत आहे.

अमळनेर तालुक्यात यंदा १८५ सार्वजनिक, १२ ‘एक गाव-एक गणपती’ आणि १० खासगी गणपती मंडळांची स्थापना झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मंडळे असतानाही देश आणि समाजासमोरील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे सजीव देखावे मोजक्याच ठिकाणी दिसत आहेत. पूर्वी पात्रे, प्रसंग आणि संवादांच्या माध्यमातून सीमेवरील जवानांचे शौर्य, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, पर्यावरणाचा ऱ्हास, पाणीटंचाई, प्रदूषण, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ तसेच सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय आव्हानांवर प्रभावी मांडणी केली जात असे. त्यामुळे देखावा हा केवळ मनोरंजन न राहता नागरिकांना विचार करायला लावणारे प्रभावी माध्यम ठरत असे. आता अशा व्यापक विषयांवरील सजीव मांडणी तुलनेने दुर्मिळ झाली असून आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य प्रतिकृती आणि मनोरंजनाला अधिक महत्त्व मिळत आहे. नागरिकांची गर्दी आकर्षित करण्यासाठी काही मंडळांकडून हॉरर शो, भीतीदायक प्रतिकृती आणि मनोरंजनात्मक सादरीकरणांकडेही कल वाढला आहे. मनोरंजनाला विरोध नसला तरी गणेशोत्सवातून समाजप्रबोधन करण्याची मोठी संधी असताना सामाजिक आशयापेक्षा केवळ आकर्षणाला प्राधान्य मिळत असल्याची चर्चा आहे.

गणेशोत्सवातील डिजिटल बॅनर संस्कृतीतही मोठा बदल झाला असून स्वागत, शुभेच्छा आणि कार्यक्रमांच्या बॅनरवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांचे भलेमोठे फोटो लावण्याचे प्रमाण वाढले आहे. गणरायाचा संदेश, सामाजिक प्रश्न किंवा जनजागृतीपेक्षा व्यक्तींची प्रसिद्धी अधिक ठळक होत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसते.

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीतील पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम आणि झांज पथकांचे प्रमाणही कमी झाले आहे. पूर्वी तालबद्ध ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या सादरीकरणाने मिरवणुकीला सांस्कृतिक रंग चढत असे. मात्र आता अनेक ठिकाणी या पारंपरिक वाद्यांपेक्षा डीजेला प्राधान्य दिले जात असल्याने पारंपरिक सांस्कृतिक बाजूही कमी होताना दिसते.

गणरायाच्या आगमनाची पद्धतही बदलली आहे. पूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना केली जात असे. आता काही मंडळांकडून चार-पाच दिवस आधीच मोठ्या मूर्ती बाहेरगावाहून आणून गावाच्या वेशीपासून किंवा मंदिरापासून डीजेच्या गाण्यांवर वाजत-गाजत मिरवणुकीने स्थापना स्थळी नेल्या जातात. या मिरवणुकीत महिला, तरुण आणि बालकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. स्वागत सोहळ्यासाठी स्वतंत्र पत्रिका छापून निमंत्रणे देण्याची पद्धतही सुरू झाली आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वीच उत्सवाचा जल्लोष सुरू होत आहे. गणेश मंडळांकडे नागरिकांचा मोठा सहभाग आणि संसाधने उपलब्ध असल्याने उत्सवाच्या माध्यमातून समाजासमोरील प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधीही मोठी आहे. देशाची सुरक्षा, पर्यावरण, जलसंकट, हवामान बदल, तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी आव्हाने, सामाजिक सलोखा, युवकांचे प्रश्न, व्यसनमुक्ती आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्या अशा विषयांवर पुन्हा सजीव देखावे उभे राहिल्यास गणेशोत्सवाला सामाजिक आशयाची जोड मिळू शकते. उत्सवाची भव्यता असावी; मात्र त्यासोबत विचारांची उंचीही वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डीजेचा दणदणाट, आकर्षक रोषणाई आणि मनोरंजनासोबत सजीव देखावे, ढोल-ताशे, लेझीम व झांज पथकांची परंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा आवाज पुन्हा बुलंद झाला तर गणेशोत्सवाचा धार्मिक उत्साह, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधता येईल.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *