
बोलीभाषेतील साहित्यातूनच अभिजात मराठीची समृद्धी : प्रा. डॉ. प्र. ज. जोशी
अमळनेर (प्रतिनिधी) साहित्य सरिता समृद्ध करणारी जिवंत झरे म्हणजे साहित्य संमेलन आहे. बोलीभाषेतील साहित्यातूनच अभिजात मराठीची समृद्धी होत आहे, असे प्रतिपादन सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्र. ज. जोशी यांनी व्यक्त केले.
मानवधन विद्यानगरी नासिक येथे सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या २३व्या राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य संमेलनाचे आयोजन १५ मार्च रोजी केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी होते. ते पुढे म्हणाले की खान्देशात येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील नवोदित साहित्यिक कवी आपल्या अहिराणी आदिवासी, तावडी, लेवा पाटीदार, पावरा, बागलाणी, गुजर वारली आशा विविध बोलीतून आपले भावनिक चिंतन साहित्याच्या कथा कादंबरी कविता या माध्यमातून आविष्कृत करीत आहे. अहिराणी बोलीभाषेची साहित्यसंमेलने भगवान पाटील आयोजित करीत आहेत. अशोक कोळी तावडी बोलीला प्रोत्साहन देत आहे. अशोक कोतवाल, कृष्णा पाटील, बाळासाहेब गुंजाळ, डॉ. संजीव गिरासे, डॉ. म. सु. पगारे, गोकुळ बागुल, वा. ना. आंधळे, बी. एन. पाटील, शशिकांत हिंगोणेकर आदी लेखकांच्या माध्यमातून बोलीभाषेतील साहित्य समृद्ध होत आहे. अभिजात मराठी भाषेला प्रेरणा देणारीच ही घटना आहे, असे विचार अध्यक्षांनी भाषणातून मांडले. संमेलनाचे उद्घाटन कवी राजा ठाकूर यांनी केले. स्वागताध्यक्ष सावळाराम तिदमे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आयोजक सतिश जैन आणि कार्यकारी मंडळ यांनी संमेलनाचे नियोजन केले. संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन व पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम झाले. संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले. संमेलनाला अनेक साहित्यिक व रसिक श्रोत्यांची चांगली उपस्थिती होती.

Leave a Reply