
स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत अमळनेरात कचरा वेचकांसाठी कार्यशाळा; विविध योजनांची दिली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी घटकाच्या अनुषंगाने अमळनेर नगर परिषद हद्दीतील कचरा वेचकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी करण्यात आले. यात विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) व अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा इंदिरा गांधी भवन येथे दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडली. मुख्याधिकारी गणेश शिंदे व लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत शहरातील घंटा गाडीमार्फत दररोज कचरा संकलन करणारे चालक व मदतनीस, तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील कर्मचारी आणि सुपरवायझर मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यशाळेसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत नियुक्त त्रयस्थ संस्था कुशाग्र फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये केंद्र सरकारच्या ‘नमस्ते योजना’, ‘राष्ट्रीय नागरी आजीविका अभियान (NULM)’, ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, बचत गट स्थापना, घनकचऱ्यावर आधारित व्यवसायाच्या नव्या संधी, तसेच ‘आरआरआर केंद्र’ यांसारख्या योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कचरा वेचकांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे आणि आर्थिक प्रगती साधणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच ‘जागतिक पृथ्वी दिना’चे औचित्य साधून उपस्थितांना घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल याबाबत जनजागृती करण्यात आली व सर्वांना हरित शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्वांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमादरम्यान स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, किरण कंडारे, शहर समन्वयक गणेश गढरी, कुशाग्र फाऊंडेशनचे देवेंद्र केळोदे, मुकेश चव्हाण, प्रज्ज्वल शेवलकर, युनुस शेख, अनंत संदानशिव, जया सरदार, तसेच घनकचरा सुपरवायझर खलील शहा व राजेंद्र गोलहीत आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply