अमळनेर शेतकी संघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व ; १५ पैकी १० जागांवर दणदणीत विजय

आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलची मुसंडी ; भाजपला फक्त दोन जागा, काँग्रेसला तीन जागांवर समाधान

अमळनेर (प्रतिनिधी) शेतकी संघाच्या निवडणुकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत १५ पैकी १० जागांवर विजय मिळवला. या विजयामुळे राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला तीन जागा मिळाल्या असून खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वातील पॅनलचा दारुण पराभव झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निकालामुळे सहकार क्षेत्रात आमदार अनिल पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शहरातील इंदिरा भुवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सुरुवातीला व्यक्तिशः मतदारसंघाची मतमोजणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघात भाजपला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर महिला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही महिला उमेदवारांनी विजय मिळविला. येथेही भाजपला अपयश आले.

सोसायटी मतदारसंघात पाच पैकी तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले तर भाजपाला दोन जागा मिळाल्या. पाचव्या जागेसाठी दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे प्रफुल पवार विजयी झाले. त्यानंतर ओबीसी, एससी-एसटी आणि व्हीजेएनटी या तिन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत भाजपला पुन्हा धक्का दिला.

निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर आमदार अनिल पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. शेतकी संघात एकतर्फी विजयानंतर आमदार अनिल पाटील यांनी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखविल्याबद्दल मतदारांचे आभार मानले.

 

पॅनल टू पॅनलमध्येही राष्ट्रवादी आघाडीवर

 

या निवडणुकीत तीन पॅनल रिंगणात होते. व्यक्तिशः मतदारसंघाच्या मतमोजणीत पॅनल टू पॅनल सरासरी पाहता राष्ट्रवादीला सुमारे २२‍०० मते मिळाली. काँग्रेसला सुमारे १५‍०० तर भाजपला सुमारे १०‍०० मते मिळाली. बाद मतांची संख्या राष्ट्रवादीकडे अधिक असल्याचेही दिसून आले. अनेक मतदारांनी पाच उमेदवारांसोबत सहावे मतदान केल्याने मतपत्रिका बाद झाल्या. याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसल्याची चर्चा होती. अन्यथा व्यक्तिशः मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आणखी दोन जागा वाढल्या असत्या, असे बोलले जात आहे.

 

संपूर्ण सविस्तर निकाल असा

 

व्यक्तिशः मतदारसंघ : एकूण ७९२५ मतदान झाले. त्यापैकी ८७३ मते बाद झाली. किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील (३४५३), सुरेश पिरन पाटील (२८२८), प्रा. श्याम पवार (२२८६) तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी पाटील (२९२५) आणि संजय पुनाजी पाटील (२७५२) विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल शिसोदे यांचा थोड्या मतांनी पराभव झाला.

महिला मतदारसंघ :  ७ हजार ४२६ मतदान झाले असून ६०५ मते अवैध ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुषमा वासुदेव देसले (३२५४) आणि मालुबाई बापूराव पाटील (२७८६) विजयी झाल्या. भाजप व काँग्रेसच्या महिला उमेदवारांचा पराभव झाला.

सोसायटी मतदारसंघ : १०६ मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील (७१), गणेश भामरे (६९), सचिन पाटील (५३) तर भाजपचे जितेंद्र पाटील (५३) विजयी झाले. प्रफुल पवार आणि महेश देशमुख यांना समान ५२ मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात प्रफुल पवार विजयी झाले.

ओबीसी मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत पाटील विजयी झाले. त्यांनी भाजपचे डॉ. अनिल शिंदे व काँग्रेसचे दिनेश पवार यांचा पराभव केला.

एससी-एसटी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर बंडू बैसाणे विजयी झाले. त्यांनी भाजपचे ॲड. एस. एस. ब्रह्मे यांचा पराभव केला.

व्हीजेएनटी मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित भीमसिंग पाटील विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बन्सीलाल भागवत व भाजपचे किरण गोसावी यांचा पराभव केला.

 

मतदारांनी विश्वास दाखविला

 

“ खरेतर या संस्थेची निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती, परंतु काहींनी जागांचा अट्टहास धरल्याने नाईलाज झाला. आज जरी १५ पैकी १० जागा विजयी झालेल्या दिसत आल्या तरी निकालाचे अवलोकन केले असता व्यक्तिशः मतदारसंघात राष्ट्रवादीचा पॅनल टू पॅनलचा एव्हरेज २२‍०० पेक्षा अधिक होता, मात्र बाद मतांचा फटका बसल्याने आमच्या किमान दोन जागा कमी झाल्या. यावरून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच विश्वास दाखविला हे स्पष्ट झाले असून यापुढे शेतकी संघाच्या उन्नतीसाठी व शेतकरी हितासाठी आम्ही कार्यरत राहू.”

-अनिल भाईदास पाटील, आमदार, अमळनेर विधानसभा

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *