अमळनेर तालुक्यातून वृद्धासह विवाहिता आणि सात वर्षांची मुलगी गायब

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहर आणि तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक वृद्ध व्यक्ती तसेच एक विवाहिता तिच्या सात वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील रामेश्वर नगर येथील नाना तुळशीराम पाटील (वय ६०) हे दि. १० जून रोजी रात्री सुमारे ९.३० वाजेच्या सुमारास कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक आणि परिचितांकडे शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांच्या पत्नीने अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन मनोरे करीत आहेत. दरम्यान, दुसऱ्या घटनेत तालुक्यातील लडगाव येथील सपना सुरेश पवार (वय २६) या आपल्या मुलगी दिशा सुरेश पवार (वय ७) हिच्यासह बेपत्ता झाल्या आहेत. दि. १० जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्या अमळनेर येथे दवाखान्यात जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत.

कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही दोघींचा पत्ता न लागल्याने सपनाचे पती यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत. सलग दोन घटनांमध्ये तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस विविध माध्यमांतून त्यांचा शोध घेत आहेत. नागरिकांना संबंधित व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने अमळनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *