
अमळनेरात महामानवास अभिवादनासाठी उसळला जनसागर
शाळा, महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव थाटात
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महामानवास अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जनसागर उसळल्याचे चित्र शहरात दिसून आले. तसेच शाळा महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.अमळनेर शहरातील आंबेडकर चौकासह विविध ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
सकाळी ८ वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी एकत्र आले. बौद्धाचार्य सिद्धार्थ सोनवणे यांनी पंचशील व त्रिशरण सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर बुद्ध वंदना करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण व संविधान पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार सुराणा, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, होमगार्ड समादेशक अरुण नेरकर, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव, संदीप घोरपडे, लालचंद सैनानी, चेतन राजपूत, ॲड. एस. एस. ब्रह्मे, नगरसेवक महेश देशमुख, श्रीराम चौधरी, कैलास नामदेव पाटील, नावेद शेख, विक्रांत पाटील, मुन्ना शर्मा, अर्बन बँक संचालक प्रवीण जैन, नितीन निळे, प्रा. विजय खैरनार, मुक्तार खाटीक, भरतसिंग परदेशी, दत्ता संदानशीव, सोमचंद संदानशीव, चैतन्य संदानशीव, तुषार संदानशीव, गुणवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांची रीघ लागलेली होती. युवा कल्याण प्रतिष्ठानतर्फे संविधान जागर अभियानांतर्गत ‘चवदार तळे’ विषयावरील लघुनाट्य प्रा. अशोक पवार, अशोक बिऱ्हाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले.
भव्य मोटरसायकल धम्म रॅलीने वेधले लक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद, सिद्धार्थ व्यायामशाळा आणि डॉ. आंबेडकर अध्ययन केंद्र, अमळनेर यांच्या वतीने माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर चौकातून भव्य मोटरसायकल धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
सायंकाळी आंबेडकर चौकात जल्लोष
जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर चौकात आकर्षक सजावट व सुशोभीकरण करण्यात आले होते. सायंकाळी विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. अत्याधुनिक डीजेच्या तालावर भीमगीतांवर तरुणाई, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता.
प्रबुद्ध कॉलनी, बंगाली फाईल, ताडेपूरा, फरशी पूल आदी भागांतून निघालेल्या भव्य मिरवणुका आंबेडकर चौकात दाखल झाल्याने वातावरण भारावून गेले. शहराच्या विविध भागांतही विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अमळनेरमध्ये महामानवाला अभिवादन: विशाल सोनवणे व व्ही. एस. ग्रुपतर्फे २५०० नागरिकांना अन्नदान
अमळनेर (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त फरशी रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विशाल सोनवणे व व्ही. एस. ग्रुप (VS Group) यांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ सुमारे २५०० हून अधिक नागरिकांनी घेतला. व्ही. एस. ग्रुप सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. विशेष म्हणजे, हा अन्नदान उपक्रम दरवर्षी बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ राबवला जातो. सामाजिक बांधिलकी जपत, यावर्षीही महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एस. ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने नियोजन केले. यामध्ये प्रामुख्याने उमेश सोनवणे, विकास कुमावत, शुभम शेटे, करण चौहान, शारुख शेख, कृष्णा बिऱ्हाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.
या उपक्रमातून सामाजिक सलोखा, सेवा आणि समर्पणाचा आदर्श दिसून आला. शहरातील विविध स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अन्नदानाचा लाभ घेतला आणि व्ही. एस. ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
पाडळसरे धरण जनआंदोलन समिती
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीतर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, नगरसेवक प्रताप साळी, सुनिल पाटील, देविदास देसले, नरेंद्र पाटील, सुनिल भोई, महेश पाटील, नारायण बडगुजर आदींनी पुष्पहार अर्पण करून समितीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भीम’ आणि ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. समितीच्या कार्यकर्त्यांसह भीमसैनिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जी. एस.हायस्कूल येथे अभिवादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शाळेचे पर्यवेक्षक एस.आर.शिंगाणे, सी. एस. सोनजे, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी राहुल पाटील, जेष्ठ शिक्षक आर.जे.पाटील, के. पी. पाटील, शिक्षकेतर प्रतिनिधी पंकज जैन उपस्थित होते. यावेळी उपशिक्षक एस.एस.चित्रे यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी संघाचे प्रमुख एच.एस.चौधरी यांनी केले तर आभार राहुल पाटील यांनी मानले.
मारवड महाविद्यालय
अमळनेर तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत श्रावण देसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे भारताच्या जडणघडणीतील योगदान यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रो. डॉ. माधव वाघमारे यांनी केले. आभार प्रो. डॉ. दिलीप कदम यांनी मानले.
फार्मासी महाविद्यालय
खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी. फार्मासी महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य प्रा.डाॅ. रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला होता. प्रा. डाॅ. एम. एस. वाघ यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, डॉ. बाबासाहेबांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन संशोधनाच्या क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. “शिक्षण, संघटन आणि संघर्ष हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे.” या विचाराचा जागर करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.प्रितम पाटील, प्रा.छाया महाजन, प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा.वैशाली कुळकर्णी, प्रा.मानसी उपासनी, प्रा.शिवानी शर्मा तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री.अनिल महाजन, सुजित अमळकर, जितेंद्र पाटील, कैलास कड, प्रकाश पाटील, प्रशांत चौधरी रोहित मकवाना, यश शिंपी उपस्थित होते.
साने गुरुजी कन्या हायस्कूल
अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण तसेच मार्गदर्शन केले. संविधान कसे आत्मसात करावे आणि आपण संविधानाची किती काळजी घ्यावी व संविधानाचा जागर जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक जे.एस.पाटील, दिलीप पाटील, वैद्य मॅडम, आर. एम. देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन, वंजारी मॅडम, गौरव पाटील व सर्व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व संचालक मंडळ यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय मौल्यवान विचारांना आठवण स्वरूपात उजाळा देऊन व त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली. तसेच कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून केली. शिक्षक श्रावण पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी केलेले अमूल्य अतुलनीय व सर्वांना व्यक्तिस्वातंत्र्य अधिकार या प्रति सुंदर अमोघ अलंकारित वाणीत मनोगत व्यक्त केले. प्रशांत वंजारी यांनी त्यांच्या आरंभीक जीवन कार्य, खडतर जीवन प्रवास त्यावर मिळवलेला ऐतिहासिक विजय व समस्त विश्वात प्राप्त केलेली कीर्ती यावर प्रकाश टाकून त्यांचे नीतिमुल्य अंगीकृत करण्याचे आवाहन केले. पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र कार्याचे वर्णन मनोगत भावना स्वरूपात प्रकट केले. समस्त कार्यक्रम सफल यशस्वी व सर्वोतोपरी साह्य शाळेचे चेअरमन डॉ. श्री संदेश जी गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही. पी. बडवे, प्रशांत वंजारी, सुरेखा सैंदाणे, सविता पवार, राजश्री पाटील समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दल
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने अग्निशमन दिन तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर उपस्थित होते.
यावेळी मुख्य अधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक दीपक चौगुले, नाविद शेख, भरतसिंग परदेशी, योगराज संदाशिव तसेच अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी सर्व अग्निशमन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply