टाकरखेड्यात शॉर्टसर्किटमुळे मक्याच्या पिकाला भीषण आग; साडेतीन बिघे जळून सुमारे दीड लाखांचे नुकसान
Created
Views
40
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा येथे दि. १७ रोजी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे साडेतीन बिघे क्षेत्रावरील मका जळून खाक झाला. या घटनेत अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,टाकरखेडा येथील शेतकरी कैलास आत्माराम पाटील यांच्या शेतात ही घटना घडली. अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण करत संपूर्ण मका पिकाला वेढा घातला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. नितीन कैलास पाटील, अमोल संजय पाटील, सतीश सुरेश पाटील, मनोहर विश्वास पाटील, संजय शिवाजी पाटील आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीचे कर्मचारी सखाराम भिल, पंकज पाटील, तलाठी प्रफुल्ल पाटील तसेच कृषी सहाय्यक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा प्रक्रिया सुरू केली व नुकसानीची नोंद घेतली. प्राथमिक माहितीनुसार, वीजवाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीत संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी कैलास पाटील यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित शेतकरी व गावकऱ्यांनी केली आहे.
Leave a Reply