११२ वर खोटे कॉल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

एका दिवसात तब्बल ४५ कॉल; निरर्थक तक्रारींमुळे पोलिसांची तारांबळ

 

अमळनेर (प्रतिनिधी) आपत्कालीन मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ११२ डायल सेवेला खोटे व निरर्थक कॉल करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. यापुढे ११२ वर विनाकारण किंवा बनावट तक्रारी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस निरीक्षक यांनी दिला आहे.

जनतेच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या ११२ डायल सेवेमुळे अवघ्या १५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचून मदत करत आहेत. मात्र काही टवाळखोर, दारूच्या नशेत असलेले तसेच विनाकारण फोन करणारे लोक या सेवेचा गैरवापर करत असल्याने पोलिसांचा वेळ आणि वाहनांचे इंधन वाया जात असल्याचे समोर आले आहे.

६ मे रोजी ८ कॉल, ७ मे रोजी ११ कॉल, ८ मे रोजी तब्बल ४५ कॉल तर ९ मे रोजी २३ कॉल प्राप्त झाल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यातील अनेक कॉल खोटे किंवा निरर्थक असल्याचे निष्पन्न झाले. एका व्यक्तीने तर एसटी बसमध्ये जागा मिळत नसल्याने जागा मिळवून द्यावी म्हणून ११२ वर कॉल केल्याची माहितीही पोलिसांनी दिली. प्रत्येक कॉल गांभीर्याने घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार तत्काळ घटनास्थळी धाव घ्यावी लागते. तसेच प्रत्येक कॉलवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा लागतो. त्यामुळे खोट्या तक्रारींमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षक निकम यांनी सांगितले. यापुढे ११२ वर बनावट अथवा निरर्थक कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *