अमळनेरात आलेल्या जोरदार वादळात झाड कोसळून विप्रो बोगद्यात वाहतूक ठप्प

प्रसूतीसाठी जाणारी महिला रस्त्यात अडकली; माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्या प्रयत्नांनी अखेर मार्ग मोकळा

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात आलेल्या जोरदार वादळामुळे विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्यात मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रेल्वे हद्दीतील झाड हटविण्यास नियमांमुळे अडथळे निर्माण झाल्याने तासन्तास नागरिक अडकून पडले होते. याचदरम्यान प्रसूतीसाठी दवाखान्यात जाणारी एक महिलाही रस्त्यात अडकून पडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

वादळामुळे विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्यात झाड आडवे कोसळले. त्यामुळे तांबेपुरा, सानेनगर, नंदगाव, लडगाव, तासखेडा, अंतुर्ली, रंजाणे, अंबारे, खापरखेडा, करणखेडा, मुडी, दरेंगाव, हिंगोणे आदी गावांकडे जाणारी वाहतूक बंद पडली. झाड रेल्वेच्या हद्दीत असल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी त्याला हात लावण्यास मनाई केली होती. दरम्यान, विप्रो बोगदा हा अधिकृत रस्ता नसून नाला असल्याचे फलक यापूर्वी रेल्वे प्रशासनाने लावलेले असल्याने प्रशासन झाड हटविण्यास तयार नव्हते. मात्र हा परिसरातील नागरिकांचा दैनंदिन वापराचा मार्ग असल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मुख्तार खाटीक घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला रेल्वे सुरक्षा बलाने विरोध दर्शविला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खाटीक यांनी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. “झाड तोडण्याचा खर्च आम्ही करतो, मात्र रस्ता तातडीने मोकळा होणे आवश्यक आहे,” अशी विनंती त्यांनी केली. दैनंदिन जनजीवनावर होणारा परिणाम आणि अडकलेल्या नागरिकांची अडचण लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने नियमांमध्ये लवचिकता दाखवली.

यानंतर गुलाम नबी यांच्या मदतीने झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला. विशेषतः प्रसूतीसाठी जाणारी महिला वेळेत मार्गस्थ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नागरिकांनी मुख्तार खाटीक यांच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *