
तथागत भगवान गौतम बुद्ध हे प्राचीन भारताची ओळख : प्रा. डॉ. राहुल निकम
अमळनेर (प्रतिनिधी) तथागत भगवान गौतम बुद्ध हे प्राचीन भारताची ओळख असून अर्वाचीन भारताची ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे विचार मानवजातीसाठी वरदान ठरले असून त्यांच्या शिकवणुकीतून समाजाला दिशा मिळते, असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा. डॉ. राहुल निकम यांनी केले.
अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती स्थापना सोहळ्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, तथागतांनी दिलेला धम्म हा सर्वांसाठी कल्याणकारी असून प्रज्ञा, शील आणि करुणा हे त्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. तसेच अनंत मैत्री, मुदिता, उपेक्षा आणि करुणा या धम्माच्या भिंती असून पंचशील व अष्टांग मार्गाचे पालन केल्यास मानवाचे जीवन समृद्ध होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातून गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींची पुष्पवृष्टी करत भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर भंते नागसेन यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे आयोजन विनोद सैंदाणे, श्याम घोलप व ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी धम्म भंते नागसेन, भंते आनंद, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे , सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, प्रा. भगवान भालेराव, हृदयनाथ मोरे, एम. एस. बैसाणे, अतुल डोळस, प्रवीण बैसाणे, कृष्णकांत शिरसाठ, भालचंद्र सनर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply