
शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला अमळनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद
१४५ अर्जांपैकी १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; २२ अर्ज प्रलंबित
अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पहिली व दुसरी फेरी मिळून एकूण १४५ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर २२ अर्ज अद्याप प्रलंबित असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहिल्या फेरीत तालुक्यातील १४ शाळांसाठी १४५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९६ विद्यार्थ्यांना प्रवेश मंजूर करण्यात आला. १५ अर्ज प्रलंबित राहिले असून काही अर्जांवरील निर्णय प्रक्रिया अद्याप सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या फेरीत ४९ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून २२ अर्जांवर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. तालुक्यातील पी. बी. ए. इंग्रजी माध्यम शाळेला दोन्ही फेऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या शाळेत पहिल्या फेरीत ३६ तर दुसऱ्या फेरीत ११ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अनुक्रमे २५ व ६ विद्यार्थ्यांना प्रवेश मंजूर करण्यात आला. याशिवाय स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळा, सायरदेवी बोहरा सेंट्रल शाळा, न्यू व्हिजन इंग्रजी माध्यम शाळा तसेच ॲड. ललिता पाटील आंतरराष्ट्रीय शाळेमध्येही पालकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले आहेत. तर श्री दत्तात्रय गुरु इंग्रजी शाळा आणि गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेमध्ये प्राप्त झालेल्या सर्व अर्जांना मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांमध्ये अद्याप कागदपत्र पडताळणी व अंतिम मंजुरी प्रक्रिया सुरू असून प्रलंबित अर्जांवर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply