
अतिवृष्टी व पुरग्रस्त शंकर नगर, संताजी नगरातील २५० लाभार्थींना किराणा किट वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : अतिवृष्टी आणि पुरामुळे घरात पाणी शिरून नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात देत अमळनेर नगरपरिषद हद्दीतील शंकर नगर, गुरुकृपा कॉलनी आणि संताजी नगर परिसरातील सुमारे २५० लाभार्थींना २० ऑगस्ट रोजी जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले. मदतीपासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्त नागरिकांची व्यथा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे आणि नगरसेवक सचिन पाटील यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मांडल्यानंतर प्रशासनाला अतिरिक्त किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
अधिक माहिती अशी की, ३१ जुलै रोजी अमळनेर शहरात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. बोरी नदी आणि पिंपळे नाला परिसरातील असंख्य नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषद हद्दीतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या १८०० नागरिकांना गेल्या आठवड्यात माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. मात्र, काही पूरग्रस्त नागरिक या मदतीपासून वंचित राहिल्याने भूषण भदाणे आणि सचिन पाटील यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे ही बाब मांडली. त्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनास किटची संख्या वाढविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २० ऑगस्ट रोजी शंकर नगर, गुरुकृपा कॉलनी आणि संताजी नगरातील सुमारे २५० लाभार्थींना किराणा किटचे वाटप करण्यात आले. शंकर नगर येथील श्रीरंग कॉलनीमध्ये माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते १४६ लाभार्थींना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक सचिन पाटील आणि नगरसेविका योगिता कापडणेकर उपस्थित होते. तसेच बाजार समितीमागील गुरुकृपा कॉलनी आणि संताजी नगर परिसरात नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून १०० लाभार्थींना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, वेद राजेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply