११ दिवसांत चार दुःखद आघात; जागतिक छायाचित्रण दिन फोटोग्राफर बांधवांनी साधेपणाने केला साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांवर अवघ्या ११ दिवसांच्या कालावधीत चार मोठे दुःखद आघात झाल्याने यंदाचा १९ ऑगस्टचा जागतिक छायाचित्रण दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोणताही भव्य कार्यक्रम, सत्कार किंवा उत्सव न करता ज्येष्ठ फोटोग्राफरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमावरील खर्च वाचवून तो सहकारी फोटोग्राफर उदय बच्छाव यांच्या जुळ्या मुलींच्या भविष्यासाठी देण्याचा संवेदनशील निर्णय घेण्यात आला.

३१ जुलै रोजी अमळनेर शहराला आलेल्या महापुराचा मोठा फटका अनेकांसह फोटोग्राफर बांधवांनाही बसला. पिंपळे नाला आणि बोरी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. या पुरात फोटोग्राफर प्रेम पाटील आणि प्रणव महाजन यांच्या स्टुडिओचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आर्थिक फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच फोटोग्राफर समाजावर आणखी एक दुःखद प्रसंग ओढावला.

३ ऑगस्ट रोजी मांडळ येथील फोटोग्राफर उदय बच्छाव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. उदय बच्छाव यांच्या पत्नी गायत्री बच्छाव यांना प्रसूतीसाठी धुळे येथे दाखल करण्यात आले होते. त्यांनी जुळ्या कन्यांना जन्म दिला; मात्र प्रसूतीनंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांचे निधन झाले. आईचे छत्र हरपलेल्या दोन चिमुकल्या जुळ्या मुली आणि त्यांचे कुटुंब या दुःखद घटनेमुळे मोठ्या संकटात सापडले. या घटनेने संपूर्ण फोटोग्राफर बांधव हळहळले. या दुःखातून सावरत असतानाच १० ऑगस्ट रोजी फोटोग्राफर आनंद पाटील यांच्या वहिनी तथा हेमंत पाटील यांच्या पत्नी उर्मिला पाटील यांचेही दुःखद निधन झाले. त्यामुळे फोटोग्राफर बांधवांमध्ये पुन्हा एकदा शोककळा पसरली.

सलग घडलेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने यंदाचा जागतिक छायाचित्रण दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. कार्यक्रमासाठी होणारा खर्च टाळून तो निधी उदय बच्छाव यांच्या जुळ्या मुलींच्या भविष्यासाठी वापरण्यात येणार आहे. फोटोग्राफर बांधवांकडून स्वेच्छेने आर्थिक मदत जमा करून ती रक्कम मुलींच्या नावाने मुदत ठेव (एफडी) स्वरूपात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुरामुळे स्वतःचे मोठे नुकसान झालेले प्रेम पाटील आणि प्रणव महाजन यांनीदेखील “आमच्यापेक्षा या चिमुकल्या मुलींना मदतीची अधिक गरज आहे,” अशी भावना व्यक्त करत मदतीसाठी पुढाकार घेतला. स्वतः संकटाचा सामना करत असतानाही सहकाऱ्याच्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची भूमिका उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.

“संकटाच्या काळात आपणच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,” या भावनेतून अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने यंदाचा जागतिक छायाचित्रण दिन केवळ साजरा केला नाही, तर माणुसकी, सहवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्शही समाजासमोर ठेवला. यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *