
शिक्षक दिनीच काळजाचा ठोका चुकवणारी घटना; दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कावपिंप्री येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडली. अनुष्का रवींद्र सपकाळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कावपिंप्री येथील दीपक सोनवणे यांची भाची अनुष्का रवींद्र सपकाळे हिचे वडील गेल्या १० ते १२ वर्षांपासून मयत असल्याने तसेच तिची आई सुरत येथे राहत असल्याने अनुष्का ही दीपक सोनवणे यांच्या चुलत काकू शोभाबाई बळीराम सोनवणे यांच्यासोबत कावपिंप्री येथे राहत होती. ती सर्वोदय माध्यमिक विद्यालय, कावपिंप्री येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असल्याने सकाळी अनुष्का विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाची भूमिका साकारत वर्गात शिकवत होती. मात्र, त्याच दिवशी दुपारी दुर्दैवी घटना घडली. शोभाबाई बळीराम सोनवणे या अंत्ययात्रेसाठी बाहेरगावी जात असताना अनुष्काने राहत्या घरातील पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी घरात स्टूल पडलेले आढळून आले. अनुष्काला खाली उतरवून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी दीपक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे करीत आहेत.

Leave a Reply