तालुका विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विचारांना मिळाली नवी दिशा

अमळनेर (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा, जिल्हा परिषद गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोन्मेषी विचारांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान मेळाव्यास तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे तसेच डी. ए. धनगर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य, संधी आणि आव्हाने” हा विषय देण्यात आला होता. तालुक्यातील अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्यासाठी सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भविष्यकालीन संधी, आव्हाने, पर्यावरणीय परिणाम आणि शाश्वत विकास यावर प्रभावी मांडणी केली. त्यामुळे स्पर्धा अतिशय चुरशीची झाली.

स्पर्धेचे परीक्षण नंदा पाटील आणि आकाश पाटील यांनी केले. या स्पर्धेत डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेरची विद्यार्थिनी मयुरी संदीप महाजन हिने प्रथम क्रमांक पटकावला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेरचा विद्यार्थी मोहक मुकेश साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी सोहम अमोल भोसले याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी एस. एस. पाटील हायस्कूल, लोंढवे येथील जयेश निंबा पाटील याची निवड करण्यात आली. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे तसेच डी. ए. धनगर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, सचिव दादासाहेब संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, नंदा पाटील आणि आकाश पाटील यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक दीपक महाजन, वैशाली पाटील, हर्षल पवार, भारती पाटील, एन. डी. पाटील, एस. एस. कसबे, डिंपल देसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री वानखेडे यांनी केले, आभार यशोदीप बागल यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *