
“तीन मित्रांची मैत्री इतकी घट्ट… शेवटचाही प्रवास झाला एकत्र!”
“सेल्फीच्या एका क्षणाने तीन घरांचे दिवे विझले!”

“हातात हात धरले… पण मृत्यूने तिघांनाही कवटाळले!”

अमळनेर (प्रतिनिधी) एका क्षणाच्या निष्काळजीपणाने तीन निष्पाप जीव काळाच्या पडद्याआड गेले. चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील खदाणीत सेल्फी काढताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा आणि त्यानंतर तिसरा मित्र धावला. मात्र तिघेही एकामागून एक सुमारे तीस फूट खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मानव बंटी रतनानी (वय १४), कार्तिक विकी उधवानी (वय १४) आणि दिनेश विजय पंजवानी (वय १७) या तिघांचा मृत्यू झाला. तिन्ही मुले अमळनेरमधील सिंधी कॉलनीतील रहिवासी होती. एकाच परिसरातील तीन मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता तिघे मित्र खदाणी परिसरात गेले होते. खदाणीत पाण्याच्या मध्यभागी बेटासारखा उंचवटा असल्याने ते पाण्यातून चालत तेथे पोहोचले. सुरुवातीला पाणी कमी असल्याने कोणताही धोका जाणवला नाही.
“सेल्फीच्या एका क्षणाने तीन घरांचे दिवे विझले!”
मात्र सेल्फी काढत असताना एका मुलाचा अचानक पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने त्याचा हात पकडला, परंतु तोही खोल पाण्याकडे ओढला जाऊ लागला. त्यानंतर तिसऱ्या मित्राने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तिघेही हातात हात धरून सुमारे तीस फूट खोल पाण्यात बुडाले.
ही घटना एका रिक्षाचालकाच्या नजरेस पडताच त्याने तातडीने धाव घेतली, तर अन्य एका नागरिकाने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी, पोलीस कर्मचारी गणेश पाटील तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
बचावकार्यादरम्यान देवळी येथील दीपक मोरे यांनी जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उडी घेत तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन व अन्य कायदेशीर प्रक्रियेसाठी हलविण्यात आले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील आणि कॉन्स्टेबल गणेश पाटील यांनी पंचनामा केला.
मृत दिनेश विजय पंजवानी हा प्रताप महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तो दारू दुकानात कामही करत होता. मानव बंटी रतनानी हा पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिकत होता. त्याचे वडील हॉटेलमध्ये कामगार आहेत. कार्तिक विकी उधवानी हाही त्याच शाळेत नववीत शिक्षण घेत होता.त्याचे वडील बेकरीमध्ये काम करतात.
“कालपर्यंत हास्याने दुमदुमणारी गल्ली… आज तीन चितांनी सुन्न झाली!”
एकाच वेळी तीन निरागस मुलांचा मृत्यू झाल्याने सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मित्रांच्या अकाली निधनाने त्यांच्या शाळा, परिसर आणि संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले असून या घटनेने पावसाळ्यात धोकादायक जलसाठ्यांजवळ जाण्याच्या धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.
कोणीही धोकादायक ठिकाणी जाऊ नये
“सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नाले, तलाव, खदाणी भरलेल्या असतात. पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे लहान मुलांनी तसेच पोहता येत नसलेल्या नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये.”
– दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक, अमळनेर

Leave a Reply