
तुटलेली वीजतार आणि असुरक्षित रोहित्रामुळे शेतकरी धोक्यात; चिमणपुरी पिंपळेतील ग्रामस्थांचा महावितरणविरोधात संताप
अमळनेर (प्रतिनिधी) खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीची धावपळ सुरू असताना चिमणपुरी पिंपळे येथील भीमराव नारायण पाटील यांच्या शेतालगत असलेल्या विद्युत रोहित्राची दुरावस्था समोर आली आहे. डीपीच्या लगत एक पोल सोडून गेल्या तीन दिवसांपासून वीजतार तुटून पडलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या रोहित्राजवळ संरक्षणासाठी आवश्यक पेटी किंवा फेन्सिंगचीही व्यवस्था नसल्याने शेतकरी व जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतात ट्रॅक्टर, मजूर आणि शेतकरी यांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी डीपीलगत तुटलेली तार आणि असुरक्षित रोहित्र हे एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. तरीदेखील महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी फोन करून माहिती देण्यात आली, मात्र अद्याप घटनास्थळी दखल घेतलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही या भागातील वीज यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागील रब्बी हंगामात याच परिसरातील गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. तरीदेखील महावितरण विभागाने त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे एकीकडे पेरणीची लगबग तर दुसरीकडे शेतात तुटलेली वीजतार आणि असुरक्षित रोहित्र अशा दुहेरी संकटाला शेतकरी सामोरे जात आहेत. “मागच्या हंगामात पीक जळाले, आता खरीप पेरणी अडली; महावितरणने आणखी किती नुकसान झाल्यावर जागे व्हायचे?” असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी उपस्थित करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तुटलेली तार दुरुस्त करावी, रोहित्राजवळ सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या पेरणीतील अडथळा दूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply