
मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप; राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्यासाठी युवक काँग्रेस-विद्यार्थी काँग्रेसचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका स्वर्गीय आशाताई भोसले यांचा शोकप्रस्ताव सादर करताना मराठी भाषेचे धिंडवडे उडवून मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हा युवक काँग्रेस आणि जळगाव जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) यांच्या वतीने गुरुवारी अमळनेर येथील तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जळगाव जिल्हा युवक काँग्रेस व जळगाव जिल्हा विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका स्वर्गीय आशाताई भोसले यांचा शोकप्रस्ताव सादर करताना मराठी भाषेतील मजकूर नीटनेटकेपणाने वाचला नसून अनेक चुका केल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्षच जर मराठी भाषेचा अवमान करत असतील तर त्या सदनातील सदस्य व इतर अधिकारी मराठी भाषेचा मान कसा राखतील, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषा हा प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असून विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनामुळे महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी सांगितले. राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय) यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मनोज पाटील, अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा सरचिटणीस ॲड. रज्जाक शेख, काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील, अमळनेर विधानसभा युवक अध्यक्ष हर्षल जाधव, अमळनेर युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष राजू भाट, माजी युवक शहराध्यक्ष सईद तेली, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष शरद पाटील, रऊफ पठाण, कैलास पाटील, प्रविण पाटील, भुवन्यू सूर्यवंशी, सृजन संदानशिव, ओमराजे पाटील, किरण खैरनार, प्रशांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply