
पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण; १५ हजार वृक्ष लागवडीच्या मोहिमेची सुरुवात
अमळनेर (प्रतिनिधी) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब अमळनेर, महिला हाऊसिंग ट्रस्ट आणि अमळनेर रेल्वे स्टेशन प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संरक्षण आणि हरित अमळनेरच्या संकल्पनेला बळ देणाऱ्या या उपक्रमात विविध संस्था, रेल्वे अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रोटरी क्लबचे सचिव आशिष चौधरी यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन आणि संरक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
या उपक्रमांतर्गत रेल्वे स्टेशन परिसरातील उद्यानात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासाठी रेल्वे प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून खड्डे खोदणे, संरक्षक कुंपण उभारणे तसेच जागेची योग्य व्यवस्था करणे अशी महत्त्वाची कामे पूर्ण केली होती.
यावेळी स्टेशन प्रबंधक अनिल बी. शिंदे, परिवहन निरीक्षक लालबाबू सिंग, वाणिज्य निरीक्षक रवी पांडे, आयपीएफ (आरपीएफ) निरीक्षक सत्यजित कुमार, स्वास्थ्य निरीक्षक सोनी सिंग, कार्यनिरीक्षक पंकज हाडेकर, कल्याण निरीक्षक अनिल पी. आर. तसेच रेल्वे प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
महिला हाऊसिंग ट्रस्टच्या पर्यावरण सखी यांनीही मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करत प्रत्येक रोपाला आधार देणे, बांधणी करणे आणि नियमित पाणी देण्याची जबाबदारी स्वीकारली. गेल्या वर्षी पर्यावरण सखींच्या माध्यमातून अमळनेर शहरात सुमारे १२ हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात आले होते. झाडे लावण्याबरोबरच त्यांना जगविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महिलांनी केले आहे.
यावर्षी अमळनेर शहरात १२ ते १५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून विविध भागांमध्ये व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरातून करण्यात आल्याची माहिती आशिष चौधरी यांनी दिली. या प्रसंगी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी, सचिव आशिष चौधरी, प्रकल्प प्रमुख प्रीतपाल सिंग बग्गा, विजय माहेश्वरी, विजय पाटील, अभिजीत भंडारकर, महेश पाटील, चेलाराम सैनानी, ईश्वर सैनानी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती आणि हरित अमळनेर घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा संयुक्त उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन रोटरी क्लबचे सचिव आशिष चौधरी यांनी केले.

Leave a Reply