
बोहरेचे सुनील चिंतामणराव अहिरराव यांना ‘शेतकरी मित्र’ पुरस्कार; राज्यपालांच्या हस्ते होणार गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोहरे येथील शेतकरी तसेच यशदा, पुणे येथील प्रशिक्षक सुनील चिंतामणराव अहिरराव यांना राज्य शासनाचा ‘शेतकरी मित्र पुरस्कार-२०२३’ जाहीर झाला असून, १ जुलै रोजी मुंबई येथे राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
राज्य शासनाच्या नाशिक विभागातून शेतकरी मित्र पुरस्कारासाठी सुनील चिंतामणराव अहिरराव यांची निवड झाली आहे. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. सुनील चिंतामणराव अहिरराव यांनी कृषी क्षेत्रात विविध प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी पोकरा, अटल भूजल योजना, जल जीवन मिशन, वसुंधरा पाणलोट, जलस्वराज्य, हरियाली, पीएमकेएसवाय तसेच इतर विविध योजनांतर्गत सरपंच आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन शेती विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांची शेतकरी मित्र पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, मंत्री इंद्रनील नाईक तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची उपस्थिती राहणार आहे.

Leave a Reply