लोकशाही हक्क, विद्यार्थी प्रश्न आणि सामाजिक सुरक्षा योजनांसाठी भाकपचे प्रशासनाला निवेदन; तातडीच्या कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी): भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप) महाराष्ट्र राज्य, अमळनेर शाखेतर्फे लोकशाही व संविधानिक हक्कांचे संरक्षण तसेच विविध जनहिताच्या प्रश्नांवर गुरुवारी (दि. २३ जुलै) उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. तालुका सचिव कॉ. वाल्मीक नारायण मैराळे व जिल्हा सचिव कॉ. ज्ञानेश्वर नगराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात विविध राष्ट्रीय व स्थानिक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यात आला. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून, आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत व आवश्यक आधार द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

यासोबतच सामाजिक सुरक्षा योजनांबाबतही भाकपने गंभीर चिंता व्यक्त केली. केवायसी (KYC) प्रक्रिया किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांचे पेन्शन व इतर शासकीय लाभ बंद झाले असून, हे लाभ तातडीने पूर्ववत करून गरजू नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 

प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

 

प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी आणि त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी आग्रही मागणी कॉ. वाल्मीक मैराळे व कॉ. ज्ञानेश्वर पाटील यांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी ॲड. आर. डी. कछवा, कॉ. प्रभुदास वामन कसबे, कॉ. नारायण सुकलाल मैराळे, शरफराज शाह, इस्माईल पठाण, सुरेश राणा, कॉ. सिताराम शंकर वडार, कॉ. समाधान वना मोरे, कॉ. अनिता भालेराव, कॉ. सपना शुभम राजपूत, साम दंगल मरसाडे, पापटू दीपक भानंदा सैदाणे, पोपट दामू निकुंभ, तुकाराम भास्कर माळी, राहुल धांडू संदानशिव, कार्तिक धांडू संदानशिव, जगदीश नामदेव संदानशिव, राजू सुरेश गव्हाणे, अनंत जगदीश संदानशिव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करून निवेदनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *