
पोलीस असल्याचा बनाव करून मारहाण; गोळी घालण्याची धमकी देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस असल्याचे सांगत दुचाकीस्वारांना अडवून मारहाण करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक २३ रोजी रात्री १० वाजता मंगरूळ परिसरात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शैलेश पुखराज पाटील (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड भाग) हे २३ रोजी रात्री आपल्या मित्रांसोबत मंगरूळ येथे जेवणासाठी जात असताना मागून येणाऱ्या चारचाकी (एमएच ०५ जीडी ९१२५ ) वाहनाने जोरजोरात हॉर्न वाजवला. त्यानंतर संबंधित वाहनाने पुढे जाऊन रस्ता अडवला. गाडीतून उतरलेल्या इसमांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जाब विचारल्यावर चालकाने राहुल या मित्राला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली, तर दुसऱ्या इसमाने शैलेश यांच्या छातीत बुक्का मारून डाव्या हाताच्या बोटांना चावा घेत जखमी केले. काही नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.
मात्र त्यानंतरही आरोपींनी दमबाजी करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी वाहन बाजूला लावून इतरांना बोलावून पुन्हा शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी शैलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३५५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

Leave a Reply