अमळनेर एसटी आगार व्यवस्थापकपदी राकेश शिवदे रुजू

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराच्या व्यवस्थापकपदी राकेश हिरालाल शिवदे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले प्रमोद चौधरी यांची विनंतीवरून भुसावळ येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी राकेश हिरालाल शिवदे यांची प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.

अमळनेर येथील रहिवासी असलेल्या राकेश हिरालाल शिवदे यांना राज्य परिवहन महामंडळातील सुमारे सोळा वर्षांचा सेवाअनुभव आहे. त्यांनी अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी पदविका प्राप्त केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळात कार्यशाळा अधीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले. उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर त्यांना आगार व्यवस्थापकपदी बढती मिळाली. सेवेच्या काळात त्यांनी चोपडा, भुसावळ, श्रीरामपूर तसेच पुन्हा भुसावळ आगारात कार्यरत राहून प्रभावी प्रशासन आणि व्यवस्थापनाची छाप पाडली. आता त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर आगाराच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राकेश शिवदे हे उत्तम प्रशासकीय कौशल्याबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे अधिकारी म्हणूनही ओळखले जातात. विविध आगारांमध्ये त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी कवी संमेलनांचे आयोजन करून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, अशा उपक्रमाची सुरुवात त्यांनी आपल्या मातृभूमी अमळनेर येथून केली होती. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.  शिवदे हे अमळनेर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक हिरालाल भोई यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *