
संत सखाराम महाराज संस्थानची पारंपरिक पायी दिंडी १ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान; ५५० किलोमीटरचा २३ दिवसांचा प्रवास
अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी वारीचे वेध लागलेल्या वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण असून अमळनेर येथील सद्गुरू संत सखाराम महाराज संस्थानची पारंपरिक पायी दिंडी १ जुलै २०२६ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. १७७५ पहिली पायी वारी निघाली होती. सुमारे २५० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या दिंडीत दरवर्षी शेकडो वारकरी सहभागी होत असून २३ दिवसांत सुमारे ५५० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून दिंडी पंढरपूर येथे दाखल होत असते.

अमळनेरच्या पैलाड भागातील तुळशीबाग येथून दिंडीला प्रारंभ होणार आहे. प्रस्थानापूर्वी संत सखाराम महाराज वाडी संस्थानात विधिवत पूजा-अर्चा, समाधी दर्शन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने वारकरी विठ्ठल भेटीच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.
८ ते १० जिल्ह्यांतून ५५० किलोमीटरचा प्रवास
अमळनेरहून निघालेली ही दिंडी सडावण, पारोळा, आडगाव, भडगाव, नगरदेवळा, नेरी, नागद, बेलखेडा, नागापूर, पिशोर, चिखलठाणा, टाकळी, दौलताबाद, वाळूज, महारूळ, बीडकीन, पैठण, शेवगाव, चितळी, पाथर्डी, माणिकदवंडी, धामणगाव, देवीनिमगाव, आष्टी, अरणगाव, फकराबाद, नानज, जवळा, करमाळा, निंभोरे, वडशिवणे, सापटणे, करकंब आणि गुरसाळे मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. खान्देश व मराठवाड्यातील ८ ते १० जिल्ह्यांतून ही वारी मार्गक्रमण करते.
उन्हाचा तडाखा, पाऊस किंवा वाऱ्याची पर्वा न करता विठ्ठल दर्शनाची आस मनात ठेवून वारकरी हा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करतात. शेतातील वाटा, ग्रामीण रस्ते आणि गावोगाव मुक्काम करत हरिनामाचा गजर अखंड सुरू असतो. दिंडीतील शिस्त, भक्तिभाव आणि सामूहिक सेवा हे या वारीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते.
वारकरी संप्रदायात मानाचे स्थान
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या विविध पालख्या व दिंडींचे मानाचे नारळ देऊन स्वागत करण्याचा मान अमळनेरच्या संत सखाराम महाराज संस्थानला लाभलेला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात या संस्थानला विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. याशिवाय आषाढ शुद्ध दशमीला संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताचा मानही संत सखाराम महाराजांच्या गादी पुरुषांना मिळतो. त्यामुळे या दिंडीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
२३ जुलैला पंढरपूरमध्ये आगमन
१ जुलै रोजी अमळनेरहून प्रस्थान करणारी ही दिंडी २३ दिवसांचा प्रवास पूर्ण करून २३ जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. २४ जुलै रोजी माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे. या पारंपरिक वारीसाठी अमळनेर शहरासह परिसरातील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
वारीची ठळक वैशिष्ट्ये
• प्रस्थान : १ जुलै २०२६, अमळनेर
• आगमन : २३ जुलै २०२६, पंढरपूर
• अंतर : सुमारे ५५० किलोमीटर
• कालावधी : २३ दिवस
• १७७५ पहिली पायी वारी
• परंपरा : २५० वर्षांहून अधिक
• सहभाग : शेकडो वारकरी
• विशेष मान : पंढरपूर येथे मानाच्या नारळाने विविध दिंडींचे स्वागत
• विशेष सन्मान : आषाढ शुद्ध दशमीला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागताचा मान संत सखाराम महाराज संस्थानला प्राप्त.

Leave a Reply